आम्ही आठजण केरळचं जंगल भटकायला आलेलो. नि आम्हाला सापडलं चिन्नाथंबींनी गोणीत जपलेलं पुस्तकांचं हे समृद्ध जंगल. एकेक पुस्तक पाहून आम्ही अवाक् झालो. या संग्रहात रोमहर्षक भयकथा, ना दुय्यम दर्जाचं बेस्टसेलर. सगळीच्या सगळी अभिजात पुस्तकं. प्रत्येक पुस्तक दर्जेदार साहित्याचा ऐवज. अगदी श्रेष्ठ राजकीय साहित्यकृतीही त्या गोणीतून निघाल्या. तमिळ महाकाव्य सिलप्पथिरकमचा मल्याळम अनुवाद होता. वैकोम मुहम्मद बशीर, एम. टी. वासुदेवन नायर, कमला दास अशा लेखकांची पुस्तकं तर होतीच. शिवाय एम. मुकुंदन, ललितांबिका अंतर्जनम् यासारखे लेखकही होते. महात्मा गांधीसोबत थोरिल बासी यांचं 'यू मेड मी कम्युनिस्ट' सारखं प्रखर राजकीय विचारसरणीचा पुरस्कार करणारं पुस्तकही त्यात होतं.
ग्रंथसंग्रह पाहून, थक्क होऊन, आम्ही ओसरीत येऊन बसलो. चिन्नाथंबीही समोर बसले. आम्ही विचारलं, "पण चिन्नाथंबी, ही अशी गंभीर पुस्तकं इथले लोक खरंच वाचतात?" अखेर मुथावन हा भारतातील अन्य आदिवासी जमातींसारखाच एक वंचित-गांजलेला समुदाय. कमशिक्षित समाज. हे मनात असल्यानं ही शंका. तिला प्रत्युत्तर म्हणून चिन्नाथंबींनी लायब्ररीतून पुस्तकं नेणाऱ्यांचं रजिस्टरच दाखवलं. हा केवळ २५ कुटुंबांचा पाडा. पण २०१३ मध्ये ३७ पुस्तकांची त्या देवघेव रजिस्टरमध्ये नोंद होती. म्हणजे लायब्ररीच्या संग्रहातून एक चतुर्थांश पुस्तकं वाचायला गेलेली. हे कौतुकास्पद.
या ग्रंथालयाचं आजीव सदस्य शुल्क केवळ २५ रूपये. नंतर मासिक फी फक्त दोन रूपये. महिन्यांतून कितीही पुस्तकं न्या, त्यासाठी वेगळं शुल्क नाही. शिवाय चिन्नाथंबींचा खास बिनसाखरेचा ब्लॅक टी मोफत. हा, पण टपरीवरील बिस्किटस् किंवा फरसाणाचे पैसे मात्र द्यावे लागतात. चिन्नाथंबी म्हणतात, "लायब्ररीचे मेंबर दूरवरून टेकड्या चढत थकून येतात." अशा एखाद्या मेंबरला कधी कधी चिन्नाथंबीसोबत दोन घास अगत्याचं जेवणही मिळतं.
लायब्ररी मेंबरनं पुस्तक घेतल्याची दिनांक, परत करायचा अपेक्षित दिनांक नि त्या मेंबरचं नाव, हे तपशील त्या रजिस्टरमध्ये व्यवस्थित नोंदवलेले. इल्लांगो सिलप्पथिकारम् या मेंबरनं एकाहून अधिक वेळा पुस्तकं नेल्याची नोंद होती. या दुर्गम रानावनांत दर्जेदार साहित्यकृती रूजताहेत, गरीब आदिवांसींची मनं या पुस्तकांनी समृद्ध होताहेत, या विचारानं आम्ही अंतर्मुख झालो. आपण शहरात राहतो, पुस्तकं आपल्याला सहज मिळू शकतात. पण वाचतो कोण नि किती? हा विचारही आमच्यापैकी काहींच्या मनाला चाटून गेला असावा.
आमच्या गटातले बहुतेकजण पत्रकार, लिखाणातून कमावणारे. आमच्या अहंकाराला आणखी एक सुई लागणं अजून बाकी होतं. कारण समोर बसलेला अल्पसाक्षर ग्रंथपालच नव्हे लेखकही होता. चिन्नाथंबींचा ग्रंथसंग्रह चाळताना आमच्यातील – केरळ प्रेस अकादमीचा विद्यार्थी पत्रकार – विष्णू एस. यानं एक वेगळंच 'पुस्तक' उचललं. खरंतर ती एक वही होती. हस्तलिखिताची अनेक पानं कोरी राहिलेली. ते होतं चिन्नाथंबींचं आत्मकथन. ते अजून अपुरं होतं. त्यामुळं त्याबद्दल बोलायला चिन्नाथंबी संकोच करू लागले. पण आम्ही आग्रह केला, "चिन्नाथंबी, दाखवा ना वाचून. कळू द्या आम्हालाही तुम्ही काय लिहिलंय ते.."
चिन्नाथंबींनी अर्धवट नोंदी केलेल्या त्या वहीतलं थोडं प्रकट वाचलं. अधूरी असली, तरी ती एक सुंदर कथा होती. या मनुष्याला सामाजिक-राजकीय जाणीव कसकशी होत गेली, याच्या आठवणी त्यात होत्या. या आत्मकथेच्या लेखकाचं वय वर्षे होतं सात – तेव्हा महात्मा गांधीची हत्या झाली. या घटनेचा त्यांच्या बालमनावर झालेला परिणाम – इथपासून ती कथा सुरू झालेली.