२०१२ साली अंजूराणीचं लग्न झालं. नि तिचं आयुष्य गटांगळ्या खाऊ लागलं. ३४ वर्षीय अंजूराणी सांगते, “नवरा रोज दारू ढोसायचा. भांडायचा. रोजचीच कटकट. माझा जीव तीळ तीळ तुटायचा.” अंजू दोन लेकींची माय आहे.
नवरा घरी दमडीही देत नसे. “लाइटबिल महिनोमहिने थकायचं,” ती सांगते, “कर्जावर कर्ज. रोज मागतकरी दारात यायचे. तोंड तरी किती न् कुणाकुणापासून लपवायचं? सारखं काळीज लकलक व्हायचं. मी कशी नांदले, माझं मलाच माहित.”
पश्चिमी उत्तरप्रदेशमधील अयादनगर गावातील सियाना कस्बा हे अंजूराणीचं माहेर. कडाक्याचं वाजलं की ती माहेरी यायची. ३० कि.मी.चा प्रवास करून. पण शेजारपाजारच्यांना तिची घुसमट कळत नसे. हे लोक तिचीच समजूत काढत. नि दरवेळी सासरी जायला भाग पाडत. गाड्यासोबत नळ्याची यात्रा असल्यागत अंजूसोबत मुलीचीही फरफट व्हायची.
अंजूची आई एकटीच रहायची. कारण वडील १५ वर्षांपूर्वी कॅन्सरनं वारलेले. “एक दिवस, मी होतं-नव्हतं ते सगळं सोडून कायमची आईकडं आले. नवरा मला परत न्ह्यायला आला नाही, मीही परत गेले नाही.” अंजू सांगते. ही कहानी तिची आई नवारच्या बाजेवर बसून निमूट ऐकत राहते.
अंजू माहेरी रोजमजुरी करू लागली. सिजननुसार कधी दोनशे, कधी अडीचशे रूपये रोजंदारीवर भागवू लागली.
२०१७ मध्ये अंजूनं पुन्हा लग्न केलं. या दुसऱ्या नात्यातनं तिला आणखी एक मुलगी झाली. “मी पुन्हा आयुष्याला सुरुवात केलेली. पण हे लग्न पहिल्यापेक्षा बत्तर निघालं. हा नवराही दारूडाच, वर मारकुटा. शिवाय हा दारूपायी घरातलं जिन्नस विकायचा. आधी धान्य, कुलर विकलं मग माझं शिलाई मशीनही. नंतर नंतर तो आसपासच्या घरात चोऱ्यामाऱ्या करू लागला. पार लाज आणली त्यानं. धरणी गिळून घेईल तर बरं, असं वाटायचं मला.”









