२०२० मधल्या कोविड-१९ च्या भयानक अनुभवाचा उल्लेख करत ४५ वर्षीय कायिल भुइयां म्हणतात, “लॉकडाउनच्या काळात, विशाखापट्टणमहून घरी पोहचेपर्यंत आम्ही सलग १२ दिवस पायी चाललो.” त्यावेळी अगानमपुडीतल्या लार्सन अँड टुब्रोच्या एका बांधकाम साइटवर ते रोजंदारीवर कामाला होते.
सगळे मिळून ८० लोकांचा तो समूह होता. त्यात १० महिला आणि चार लहान मुलं होती. जवळपास १,००० किलोमीटर दूरवर असलेल्या झारखंडच्या दिशेने ते पायी निघाले होते. “आम्ही रात्रंदिवस चालत राहिलो. चालून चालून थकलो की तासभर झोपायचो आणि परत चालायला लागायचो.” हा सगळा खटाटोप झारखंडमधल्या पलामू जिल्ह्यातल्या रबदा गावात असलेल्या आमच्या घराकडे परत येण्यासाठी होता.
आज जवळपास सहा वर्षांनंतर, कायिलनी अशाच एका प्रवासाला सुरुवात केली. ते पुन्हा एकदा एका भयावह वास्तवाकडे परतायला लागले. या वेळी शहर होतं देशाची राजधानी दिल्ली अन् प्रवासाचं साधन होतं रेल्वे.
कर्ज त्यांच्या गळ्यापर्यंत आलंय.
अमेरिका-इस्रायलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धामुळे एलपीजी सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला. याचा मोठ्या प्रमाणात फटका स्थलांतरित मजुरांना बसलाय.
ते नोएडातल्या एल अँड टीच्या बांधकाम स्थळावर ५०० रुपये रोजाने गवंडी काम करत होते. त्यांना आठवतं, की “पुन्हा एकदा लॉकडाउन येणार आहे” असं मार्चच्या सुरुवातीला प्रत्येकजण म्हणू लागला.
त्यानंतर एलपीजीचे दर तिप्पट झाले. ९० रुपयांवरून ३०० रुपये प्रति किलो. ते म्हणाले, “आम्ही (स्वयंपाकासाठी) लाकडी साहित्य आणि प्लायवूड जाळलं. कसंबसं निभावून नेलं. पण जेमतेम १० दिवसच ते शक्य झालं.








