आम्हा कोरकूंची एक धारणा आहे : शेतात वाघाचं येणं हा शुभयोग! वाघाच्या पावलांचे ठसे कास्तकाराच्या शेतापर्यंत येणं हा समृद्धीच्या आगमनाचा संकेत.
माझं नाव रामलाल. महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर एरियातील पायविहीर हे माझं गाव. नि या लेखाचा दुसरा लेखक, मी वसंत. माझं गाव बोराट्याखेडा. व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी कुशीत वसलंय माझं गाव. आम्ही दोघंही कोरकू आदिवासी समुदायातले. आमचे बापजादे मेळघाटच्या जंगलातले. आम्हीही या जंगलातल्या झाडांगतच इथं खेळलो-वाढलो.
आज्यापणज्यांकडून पारंपारिक ज्ञान-समजुतींची शिदोरी आमच्यापर्यंत पोचलीय. गायीम्हशींच्या शेणातील पोंवात वाघाच्या पावलाचे ठसे दिसले, तर आम्ही तो शुभसंकेत जपतो. शेणाचा तो पों आम्ही कणगीतल्या धान्यात ठेवतो. असं केल्यानं त्या घरी कधीच अन्नधान्य कमी पडत नाही, असं आम्हाला वाटतं.
आम्ही मका, ज्वारी, भात, गहू, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, तूर, मूग, हरभरा आणि इतर कडधान्ये पिकवतो. शेतात पिकतं, त्यातलं बरच आम्हाला पोटापुरतं होतं, उरलेलं बाजारात विकतो. आमच्या समाजातील बहुतेक शेतकऱ्यांना वनजमिनीवर शेती करण्यासाठी वैयक्तिक वनहक्क मिळालेत. आमची बहुंताश शेती कोरडवाहू. मॉन्सूनवर बेतलेली. एरवी सिंचनासाठी आसपासचे ओढे-ओहोळ नि विहिरींमधील पाणीही उपयोगात येतं.
















