तुमच्यासमोर एक अंधारा मंच आहे. आणि तिथे एका चौथऱ्यावर स्त्रिया आणि पुरुषांच्या काही आकृती दिसतायत. “प्रत्येक आणि प्रत्येक वर्षी वरून डोंगरातून आलेली माती इथे वाहत येते आणि या बॅकवॉटर्समध्ये समुद्रकिनाऱ्याला समांतर साचत राहते.” केरळच्या एर्णाकुलम जिल्ह्यातल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या गावांचा आणि या भूमीचा इतिहास हा आवाज आपल्याला सांगायला लागतो. या माणसांच्या आकृत्यांमागे एका पडद्यावर वेगवेगळी चित्रं सरकत राहतात. १३४१ सालापासून. तेव्हा मुझिरिस बंदराचा भाग होता हा सगळा प्रदेश.
हळूहळू समोरचा रंगमंच उजळू लागतो. आणि मग घरासमोरच्या पुराच्या गुडघाभर पाण्यातून वाट काढत चाललेली दहा माणसं आपल्याला दिसतात. थकलेली, पाण्यात भिजलेली त्यांची पावलं पाणी कापत प्रेक्षकांच्या दिशेने यायला लागतात. मागे एखाद्या भोंग्यासारखा सुरू असलेला आवाज मोठा होत जातो.
सैलजा के एस रंगमंचावरच्या या दहा जणांपैकी एक. या प्रयोगाचं नाव आहे चेवित्तोरमा. हा कॅथोलिक पंथाच्या लोकांमधला एका रिवाज आहे. शेवटचे श्वास मोजणाऱ्या माणसाच्या कानात अगदी हलक्या आवाजात प्रार्थना म्हटली जाते. त्याच्या जिवाला बरं वाटावं म्हणून. या रिवाजाचं नाव म्हणजे चेवित्तोरमा. सैलजांना अभिनय करण्याचा कोणताही अनुभव नाही. खरं तर समुदाय नाटक या प्रकारात वास्तव कुठे संपतं आणि कल्पना कुठे सुरू होते हेच कळत नाही असं त्यांना वाटतं.
“माझी आई मला सारखी म्हणायची की लहानपणी मी फार खट्याळ होते. आणि फक्त खट्याळ नाही नुसता धिंगाणा घालायचे म्हणे. त्या काळात ती मला जेवू घालण्यासाठी म्हणून गोष्टी सांगायची. ऊन ऊन भात, त्यावर खोबरेल तेलाची धार आणि मीठ...आज ते वास आठवूनही मला तोंडाला पाणी सुटतं. पुढे मी १२-१३ वर्षांची झाल्यावर एक हस्तरेषा पाहून भविष्य सांगणारा आमच्या घरी आला होता. त्याने माझा हात पाहिला आणि म्हणाला, “ती हे घर पार फुकून टाकणार आहे. मीठाचा कणसुद्धा राहणार नाही!’ मला हे ऐकून कसं तरीच झालं. मी असं काही कसं करेन? पण सगळे जण भरपूर हसले.”
“काही वर्षं गेली. २०१८ साली माझी आई माझ्या सोबत होती. खरं तर बिचारी काही दिवसांसाठीच माझ्याकडे रहायला आली होती.” आणि मग पुरानंतर लगेचच आपली आई वारल्याची गोष्ट सैलजा सांगतात. हातात मिठाची बरणी.
“नाटकाचा हा सगळा गट म्हणजे एक कुटुंबच आहे. माझ्या मनाला उभारी घ्यायला मला यांची मदत झाली. आणि मला हे समजलं की माझ्यामध्ये सुद्धा काही तरी करण्याची आणि समाजाचं ऋण फेडण्याची क्षमता आहे,” ५७ वर्षीय सैलजा सांगतात. आवाजात अभिमान. त्या स्वतःला ‘होम मेकर’ म्हणतात. खरं तर घरी तयार केलेली लोणची विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. आणि अलिकडेच त्यांनी एका दागिन्यांच्या दुकानात विक्रेती म्हणून काम सुरू केलंय. “२०१८ मध्ये जे झालं त्यातून बाहेर पडायला मला या कम्युनिटी थिएटरचा उपयोग झाला. माझे स्वतःचे अनुभव मला दुसऱ्यांना सांगता आहे. खास करून आम्ही अशा पुरांचा मुकाबला कसा करतो याची काहीही कल्पना नसलेल्यांना.”


















