माझं नाव ‘संध्या’ असं ठेवलं गेलं. ही एक अशी वेळ असते जेव्हा सगळीकडे अंधार दाटून येत असतो. कदाचित माझ्या काळ्या रंगामुळे माझ्या कुटुंबाला वाटलं की हे नाव मला अगदी शोभून दिसतं.
कदाचित काळ्या त्वचेमुळे असेल, कुटुंबाकडून माझ्या वाट्याला प्रेम, कौतुक किंवा लाड करणं असं फारसं काही आलंच नाही. हाच माझा लहानपणीच अनुभव आहे आणि त्यामुळे मला वर्णद्वेष म्हणजे काय हे फार लवकर समजलं आणि मग ते मनात खोलवर रुतून बसलं.
माझा जन्म १९९६ मध्ये झारखंडमधील संघरी गावात मुंडा आदिवासी कुटुंबात झाला. माझी आई निर्मला केरकेट्टा आणि वडील सुमन लकडा. आमचं घर जंगल, नद्या, ओढे यांनी वेढलेलं आणि झारखंड-बिहारच्या सीमेवर वसलेल्या चतरा जिल्ह्यात आहे.
माझे आई-वडील शेतकरी आहेत. आमच्याकडे दोन एकर शेती आहे जिथे हवामानानुसार आम्ही भेंडी, शेंगा, बटाटे, फुलकोबी, गाजर यांसारख्या भाज्या उगवतो. भातशेतीही करतो. पण त्यातून फार काही उत्पन्न मिळत नाही. वडील मजुरीवर करत असलेली शेतीची कामं, रस्ते बांधणीची कामं, बोरवेल खोदणे अशी काम करून एकूण मिळून आमचं वार्षिक उत्पन्न सुमारे ३०,००० रुपयेच आहे.
माझे आई-वडील मोहापासून (मधुका लाँगिफोलिया) बनवलेली देशी दारूही विकायचे. त्यातून आमच्या सहा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. मला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. त्यांनी आमच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी गावात एक छोटंसं मिठाईचं दुकानंही उघडलं होतं.
सुमारे १५ जणांच्या मोठ्या कुटुंबात राहायचं म्हणजे कामाचं ओझं कायमच. वय वाढल्यावर मी घरात मोलकरणीसारखी सगळीच कामं करायला लागले. सात वर्षांची असताना, जेव्हा मी दुसरीत होते, तेव्हापासूनच मी पूर्ण घरासाठी स्वयंपाक करणे, भांडी धुणे, घर साफ करणे, गोशाळा स्वच्छ करणे, गायी-मेंढ्यांना चरायला घेऊन जाणे, जंगलातून जळणासाठी लाकूड आणणे अशा सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होते.


















