"ट्रेनच्या दारात ही गर्दी असते. चेंबरत, रेटून घुसावं लागतं. गाडी मिनिट-पाच मिनिट प्लॅटफॉर्मला लागतीय. अशा वक्ताला घुसायच्या गडबडीत, कधीकधी गठुडं प्लॅटफॉर्मवरच सुटतं. गठुडं मागं न् आम्ही पुढं. गठुड्यात असतं, आमचं कष्ट न् आमदनी. आमदनी मागं न् आम्ही तिच्यामागं... गठुडं हरवलं की, जीव तिळतिळ तुटतो... " सारंगा राजभोई सांगते. ती ज्या गाठोड्याबद्दल बोलतेय, त्यात दडलेलं कष्ट खरोखरच आपल्या कल्पनेपलीकडचं. सारंगी नि तिच्या जातसमुदायातील महिलांचं काम तसं बेदखलच. या महिला कापड गिरण्यांतून 'स्क्रॅप' माल उचलतात. त्यापासून दोरखंड वळतात. गायीगुरांसाठी वेसण, ट्रकवर लादलेला माल करचकचून बांधायची रश्शी असो की कपडे वाळत घालायची दोरी अशा विविध वापरांसाठीचे दोर या महिला विणतात.
सिंथेटिक फायबरच्या ढिगाऱ्यातील दोऱ्यांचा गुंता उसवत सांतरा राजभोई म्हणते, "हाच आमचा खानदानी पेशा." अहमदाबादमधील वातवा परिसरात नगरपालिकेनं बांधलेली कॉलनी आहे. त्यातल्या एका खोलीसमोरील अंगणात सांतरा आपल्या 'उद्योगात' गुंतलीये.
सारंगा व सांतरा या गुजरातमधील 'राजभोई' या भटक्या जमातीतील महिला. या बाया अहमदाबाद ते सूरत दरम्यान ट्रेननं नियमित जातात. या वाटेवरील टेक्स्टाईल मिल्समधून टाकावू फायबर विकत घेतात; नि मग या तंतूंपासून दोऱ्या विणतात. फायबर मिळवण्यासाठी रात्री अकरा दरम्यान त्या घर सोडतात. एक एक मिल करत त्या भटकतात. घरी परतायला त्यांना दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ होते. तोवर त्यांची छोटी मुलं सगेसोयरे नि शेजारपाजारच्या भरवशावर सोडलेली असतात.
या महिला विशिष्ट रूटवर विशिष्ट गाड्या पकडतात. या ट्रेन कापड गिरण्या असलेल्या गावांच्या स्टेशनांवर अनेकदा मध्यरात्री किंवा पहाटे थांबतात. अशावेळी या महिलांना प्लॅटफॉर्मवरच रात्र काढावी लागते. या कामात ओघानंच सामील झालेला एक छळवाद. - "आम्ही रात्री प्लॅटफॉर्मवर पोलिसांना दिसलो की, ते चौकशीला ताब्यात घेतात. कुठून आलो न् कुठं जाणार...पोलीस नेहमी गरीब माणसांनाच धारेवर धरतात." करूणा सांगते, "पोलिसांच्या मनात आलं तर ते आम्हाला लॉकअपमध्येही टाकतात."
करूणा, सांतरा व सारंगा, तिघींची घरं 'चार मालिया' वसाहतीत आसपासच आहेत. ही वसाहत नगरपालिकेनं वसवलीय. पण तिथं ना नियमित पाणीपुरवठा, ना गटारांची सुविधा. या घरांना वीज सुविधा मिळवण्यासाठीही अटापिटा करावा लागलाय. असं या महिला पोटतिडकीनं सांगतात.


























