पहाटेचे पाच वाजलेत. सूर्याचं आगमन व्हायला अवकाश आहे. हथुआमधील लोक अजून साखरझोपेत असतील. बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील या टुमदार नगराला पहाटवाऱ्यासोबतच दोन वेगवेगळ्या स्वरांनी जाग येते. एक आवाज असतो इथल्या मशिदींमधून येणाऱ्या अजानचा — 'अल्लाहु अकबर! अल्लाहु अकबर! अशहदु अं लाऽ इलाहा इल्लल्लाह...' या आळवणीसोबतच, झांजमंजिरीचा नाद ऐकू येतो नि आणखी एक जयघोष घुमू लागतो — ‘हरे रामाऽ, हरे कृष्णाऽ, हरे कृष्णाऽ, हरे रामाऽ’
या दोन्ही तालस्वरांसोबत ऐकू येतो बासरीचा नाद. ईश्वराशी संवाद साधणारे दोन ध्वनी बासरीच्या एकाच सूरासोबत तरळू लागतात. अशा प्रसन्न-शांत सुमधूर वातावरणात या शहरात सूर्याचं आगमन होतं.
बासरी वाजवणारा हा कलाकार कोण? त्याला भेटायची उर्मी मला ‘गोपाल मंदिरा’कडे खेचते. हथुआच्या महाराणी श्याम सुंदरी कुंवर यांनी १७६ वर्षांपूर्वी बांधलेलं हे भव्य मंदिर. १८५० ते १८६६ या काळात ते उभारलं गेलंय. या भव्य मंदिराभोवती दोन किल्लेही आहेत. एकाला म्हणतात जुना किल्ला, दुसऱ्याला नवा किल्ला. शिवाय एक शीश महाल. या वास्तू हथुआच्या वैभवाची साक्ष देतात. मंदिराचं भव्य प्रवेशद्वारही तितकच शाही. त्या काळात सुमारे ४,५०,००० चांदीची नाणी खर्चून हे प्रवेशद्वार उभारलेलं. आज हिशोब लावला तर सुमारे ५५ कोटी रुपयांचं हे नुसतं महाद्वारच होईल. या शाही कमानीसमोर सुरक्षा रक्षक तैनात आहेत. मंदिराच्या या परिसरानं १४ एकर जमीन व्यापलीय. त्यात बाग-बगीचे, कारंजे, तलाव नि संस्कृत विद्यापीठाची इमारत आहे. नि अर्थातच मुख्य आकर्षण आहे अनेक दालनांनी समृद्ध व सुप्रसिद्ध गोपाल मंदिर.
हे मंदिर हथुआ संस्थानाच्या वारसांची खासगी मालमत्ता आहे. सर्वसामान्यांसाठी ते सकाळी व संध्याकाळी खुलं असतं; मी सकाळची वेळ साधून तिथं गेलेलो. अन्य भाविकही हळूहळू येत होते. गाभाऱ्यातील राधा-कृष्णाच्या मूर्तींची आरती नुकतीच झालेली. मूर्तींसमोरील ऐसपैस सभागृहात तबला, हार्मोनियम आणि झांज घेऊन बसलेले कलाकार दिसतात. त्या समूहाच्या मधोमध बसलेली व्यक्ती — मोहम्मद सगीर अन्सारी – हे तेच, ज्यांच्या बासरीबद्दल ऐकून मी इथं आलोय.
वयानं सत्तरी गाठलेला हा ज्येष्ठ मुस्लिम कलावंत. हिंदू देवळात कला अर्पण करण्यात त्यांना काहीच अस्वाभाविक वाटत नाही. “भेदाभेद काही नसतो. सर्व माणसं इथून तिथून सारखीच,” ते म्हणतात, “हमे मिलजुलकेही रहना चाहिए, मेरी यह कला एक ग्यान है, जो खुदासे मुझे मिला है, और ग्यान बाटनें में गलत कुछ भी नहीं है, पिछले दस सालों से मै यहाँ मंदिर में बांसुरी बजा रहाँ हुँ”







