‘वाह या’ हे वाद्य हाताच्या तळव्यावर सहज मावतं. साडेचार इंच लांबीचं हे वाद्य वाह (बांबू) पासून तयार करण्यात येतं आणि ते ‘प्रेमाची’ निशाणी असल्याचं न्गाप लो म्हणतात आणि बांबूची ती लहानशी पट्टी आपल्या ओठांजवळ नेऊन वाजवतात.
न्गाप पूर्वी नागालँडच्या मोन जिल्ह्यात शेतकरी होत्या. आमच्याशी बोलत असताना त्या आपल्या बाहीवर असलेलं छोटं वाद्य बाहेर काढतात. आपल्या डाव्या हाताने त्या बांबू आणि सुतळीचं एक टोक धरतात. आणि उजव्या हाताने सुतळीचं दुसरं टोक, ज्याला रंगीत धाग्याचे तुकडे लटकले आहेत, धरून ते वाद्य वाजवू लागतात.
न्गाप यांच्या शेजारी त्यांच्या बालपणीच्या मैत्रिणी यिंग लिह आणि न्येली बसल्या आहेत. तिघीही आता वयाच्या साठीत आहेत. तिघी मोन गावातील बॅप्टिस्ट चर्चच्या शेजारील मैदानात होणाऱ्या आओलेयांग सणासाठी आल्या आहेत.






