असारी विश्वकर्मा समाजात मोडतात. धातू, दगड आणि लाकडाचं काम करणारा हा समाज आहे. त्यांच्यामधली सर्जनशीलता बाजूला राहिलीये आणि आता केवळ जाती आधारित कामं आणि त्यासंबंधी मजुरी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नव्या पिढीतली मुलं आता पांढरपेशा नोकऱ्यांकडे वळत असल्याचं टी. एम. कृष्णा आपल्या ‘सबॅस्टियन अँड सन्स’ या पुस्तकात लिहितात.
“आपण वंशपरंपरेबद्दल, जातीशी संबंधित व्यवसायांबद्दल बोलतो तेव्हा तेव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या या कामाबद्दल किंवा कौशल्याबद्दल आपण फार भावुक, रोमॅन्टिक पद्धतीने बोलता कामा नये. कारण सगळे लोक आणि सगळे व्यवसाय आपल्या इथे एका पारड्यात तोलले जात नाहीत,” कृष्णा म्हणतात. “उच्च मानलेल्या जाती जेव्हा अशा प्रकारे काम पुढच्या पिढीला शिकवतात तेव्हा त्याला संस्कृतीचं, ज्ञानाचं जतन म्हणलं जातं. ते ज्ञान वापरणाऱ्या, ते कौशल्य असणाऱ्याला कुठलंही दमन सहन करावं लागत नाही. मात्र शोषित जाती पिढ्यान् पिढ्या जे व्यवसाय किंवा काम करत आहेत त्याला मात्र ज्ञानाचा दर्जा दिला जात नाही. किंवा त्यांच्याकडे ज्ञाननिर्माते म्हणून पाहिलं जात नाही. त्यांना कायम दुय्यम मानलं जातं, त्यांच्या कलेला हीन मानलं जातं आणि त्यांच्या कामाकडे शारीरिक कष्टाचं काम म्हणून पाहिलं जातं. शिवाय, जातीने घालून दिलेलं काम करत असताना देखील त्यांना शोषण आणि हिंसेचा सामना करावा लागतो. अनेकदा तर दुसरा कुठला पर्याय नाही म्हणून देखील कुटुंबाच्या जातीशी संबंधित व्यवसायच अनेकांना करावे लागतात.”
“आपल्या देशात वाद्य तयार करणाऱ्या सगळ्यांबद्दल या अशाच तांत्रिक पद्धतीने बोललं जातं. अर्थात बोललं गेलं तर,” कृष्णा म्हणतात. “त्यांचा विचार ते मिस्त्री आहेत असा केला जातो. एखाद्या बांधकामावर काम करतात ना तसं. वाद्य वाजवणारा त्याचा खरा रचनाकार मानला जाणार. वाद्य निर्मितीचं श्रेय न देण्याचं, आणि दिलंच तरी अगदी फुटकळ श्रेय देण्याचं कारण म्हणजे जात.”
मृदंग तयार करण्याचं काम पुरुषांचंच, कुप्पुसामी सांगतात. “काही बाया चामड्याचं काम करतात. पण लाकडाचं, खोडाचं काम मात्र पुरुषच करतात. ज्या फणसाला फळ लागायचं थांबलंय त्या झाडाचं लाकूड या कामासाठी वापरलं जातं. जुनी, फळ न लागणारी झाडं ‘क्लोज’ करून टाकतात,” कुप्पुसामी सांगतात. “दहा झाडं तोडली तर त्याच्या बदल्यात ३० नवी झाडं लावली जातात.”
लाकूड कसं असावं याबद्दल कुप्पुसामी यांचे बरेच ठोकताळे आहेत. त्यांना ९-१० फूट उंचीचं झाड जास्त आवडतं. रुंद आणि मजबूत. रस्त्याच्या किंवा कुंपणाच्या कडेला असलेलं कधीही चांगलं. ते शक्यतो बुंध्याच्या खालचा भाग घेतात. रंगाने गडद. त्याचा नाद जास्त घुमतो.
एका दिवसभरात ते सहा मृदंगांची खोडं कापून तयार करू शकतात. पण त्याचं सगळं काम नीट पूर्ण व्हायला दोन दिवस लागतात. नफा मोजकाच. एखाद्या मृदंगाचे १००० रुपये मिळाले तर त्यांच्यासाठी पर्वणीच. अर्थात “कारागिरांना १,००० रुपये द्यावे लागतात ते सोडून. हे मेहनतीचं काम आहे. कुणी पण सहज येणार नाहीत, कळलं का?”
लाकूड काही वर्षभर मिळत नाही. फळ धरण्याच्या काळात कुणीच झाडं तोडत नाही. त्यामुळे “मला लाकूड साठवून ठेवावं लागतं,” ते सांगतात. पाच लाखाची गुंतवणूक असते त्यांची. २५,००० रुपये किमतीचे २० बुंधे/खोडं. इथेच सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. “त्यांनी जर आम्हाला लाकूड विकत घ्यायला कर्ज किंवा अनुदान दिलं तर... फार फार बरं होईल!”
मृदंगांना मागणी चांगली आहे, कुप्पुसामी सांगतात. देशात आणि परदेशात सुद्धा. “एका महिनाभरात मी ५० मृदंग आणि २५ तविळ विकतो.” खरी समस्या म्हणजे योग्य लाकूड मिळवणं आणि चार महिने त्याची चांगली देखभाल करणं. पनरुतीच्या फणसाचं लाकूड सर्वोत्कृष्ट असल्याने, “त्याला फारच मागणी असते.” कुप्पुसामी सांगतात. या भागातल्या लाल मातीमुळे या लाकडाला त्याचा नाद मिळाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे.