“मी दररोज सकाळी जात्यावर दळण दळण्यासाठी आईला मदत करायचो, तेव्हाच तिच्याकडून दळण दळायला आणि ओव्या गायला मी शिकलो,” भांबर्डे गावातले बबन दिघे म्हणाले. जात्यावरच्या ओव्यांच्या संग्रहामध्ये ध्वनीमुद्रित केलेल्या गाण्यांमध्ये या एकमेव पुरुषाचा आवाज आपल्या कानावर पडतो. ५५ वर्षीय बबन दिघे अगदी लहानपणापासून या जात्यावरच्या ओव्या गातात.
ते लहान असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं, त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं खरं पण सावत्र आईकडून त्यांना कधी प्रेम मिळालं नाही. त्यांना घरात जेवणही मिळायचं नाही. त्यामुळं हाताला मिळेल ते लहान सहान काम करून त्यांनी आपलं पोट भरलं.
या संग्रहात बबन दिघेंच्या १९ ओव्या आहेत. त्यापैकी १७ ओव्या ऑडिओ ध्वनीमुद्रित केल्या गेल्या आहेत तर काही गाण्याच्या क्लिपमध्ये सादर केलेल्या आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये जेव्हा आम्ही त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी चार नवीन ओव्या गायल्या, ज्या आम्ही व्हिडिओमध्ये मुद्रित केल्या. “मी लहान होतो तेव्हा माझा आवाज गोड आणि बारीक होता,” बबन सांगतात.
व्हिडिओमधल्या गाण्यात बबन उगवत्या सूर्याचं वर्णन करतात, त्याला देव म्हणून संबोधतात आणि सूर्यकिरणांची तुलना भावाच्या तारुण्याच्या तेजाशी करतात. ‘पुतळा’ हे नाव शक्ती आणि देखणं रुप असलेल्या भावासाठी वापरलं जातं. हा गायक सूर्यदेवाला लवकर येण्याची आणि भविष्य उजळवण्याची विनंती करतो.



