पटनातल्या रस्त्यांवर चकाकणाऱ्या, घुमटाकृती काचेच्या सिपार पाहणे हा जणू नेत्रदीपक सोहळाच असतो. “तलवारींपासून ढालीपर्यंत सर्वच, अगदी सजावटीसाठीचे डाळिंब देखील काचेपासून बनवलेले असते.” नजरे इमाम पटनाच्या प्रसिद्ध काचेच्या सिपारबद्दल अभिमानाने सांगतात.
हे बारकाईने कोरीव नक्षीकाम केलेले सिपार मुहर्रमच्या काळात दिसतात. पूर्वीच्या काळी युद्धात वापरल्या जाणाऱ्या सिपारशी साधर्म्य साधणारे हे सजावटी सिपार संपूर्णपणे काचेपासून तयार केलेले असतात आणि तलवार, ढाल, धनुष्य, बाण यासारखी बरीच सजावटी आयुधं देखील याची शोभा वाढवतात.
इथून साधारण एक किलोमीटर अंतरावर, ४० वर्षीय कारागीर मोहम्मद नासिर यांनी आपल्या 'सिपारचं काम नुकतंच पूर्ण केलं आहे. ते आपल्या मुलींसह कार्यशाळेच्या दाराशी उभं राहून स्वतः साकारलेल्या या कलाकृतीकडे कौतुकाने पाहतायत. ही नाजूक कलाकृती घराच्या ओट्यावर मांडून ठेवली आहे; या परिसराच्या अगदी जवळ 'बाग कालू खान' या जुन्या वस्तीतील काही घरे आणि एक मजार आहे.
“हे काही एका माणसाचं काम नाही,” कारागीर नासिर सांगतात. “यात अनेक कलाकौशल्यांचा संगम साधला गेला आहे. यातील काही कौशल्ये मूळची बिहारमधील आहेत, तर काही देशाच्या इतर भागांतून आलेली आहेत.”
ते सिपारमध्ये वापरल्या गेलेल्या विविध कलाप्रकारांची उदाहरणे देतात. जसं की आरी, झरदोसी, कशीदाकारी, छापा, नग आणि काही ठिकाणी मीनाकारी. आरी हे कापडावर अवघड नक्षीकाम करण्यासाठी आकड्याच्या सुईचा वापर करणारं तंत्र आहे; झरदोसी म्हणजे धातूच्या तारा वापरून केलेलं भरतकाम; कशीदाकारी हे बिहारमध्ये केले जाणारे काश्मिरी शैलीतील भरतकाम आहे आणि छापा म्हणजे धातूच्या रंगांचा वापर करून लाकडी ठशाने केलेले छपाईकाम.
या सिपारमध्ये मीनाकारी आणि नग कलाकुसरीचाही समावेश आहे; नग कलेमध्ये बारकाईने कोरीव काम केलेले आणि पैलू पाडलेले रत्नखडे कापडावर चिकटवले जातात.



















