आज संतोषी कोरी, जमीन मालक असल्याचा अकल्पित आनंद घेत आहे. “महिला शेतकऱ्यांची सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय आम्ही महिलांनी घेतला आणि आता गावकरी मान्य करतात की ही संकल्पना चांगली आहे”, ती हसत हसत सांगते.
भैराहा पंचायती अंतर्गत येणाऱ्या गुचरा खेड्यात राहणाऱ्या संतोषी या दलित शेतकरी महिलेने १,००० रुपये भरून “रुंज महिला कृषि उत्पादक सहकारी संस्थेचे (एमएफपीओ) सदस्यत्व घेतले. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात जानेवारी २०२४ मध्ये या संस्थेच्या सभासद झालेल्या जवळजवळ ३०० दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय शेतकरी महिला सदस्यांमध्ये तिचा समावेश झाला. संतोषी आज एमएफपीओच्या पाच सदस्यीय मंडळाची सदस्य असून लोकांना संबोधित करून त्यांना या योजनेची माहिती देण्यायाठी तिला बोलावलं जातं.
पूर्वी अडत्या (व्यापाऱ्याचा दलाल) येऊन आमची तूर डाळ (कबूतर मटार) भरडलेली नसल्यामुळे स्वस्तात घेऊन जात असे. पण तो परत केव्हा येईल याची खात्री नसल्यामुळे आमचे पैसे कधीच मिळत नसत, संतोषी ‘पारी’शी बोलताना म्हणाली. तीन मुलांची आई असलेली ४५ वर्षीय संतोषी, आपल्या कुटुंबाच्या दोन एकर जिराईती जमिनीत तूर डाळीची लागवड करते. या शिवाय आणखी एक एकर जमीन तिने भाड्यावर घेतली आहे. भारतात केवळ ११ टक्के महिला जमिनीच्या मालक आहेत आणि याला मध्य प्रदेश अपवाद नाही.
यमुनेत विसर्जित होणाऱ्या बघैन नदीची उपनदी ‘रुंज’ च्या नावे स्थापन केलेल्या ‘रुंज महिला कृषि उत्पादक सहकारी संस्थे’च्या(एमएफपीओ) अजयगढ आणि पन्ना ब्लॉकमधील २८ खेड्यातील महिला शेतकरी सभासद आहेत. २०२४ मध्ये सुरू केलेल्या या संस्थेची उलाढाल ४० लाखांच्या घरात असून येत्या वर्षभरात ती दुप्पट करण्याचा उद्देश आहे.










