सप्टेंबर महिन्यातल्या त्या संध्याकाळी व्हॉट्सॲप ग्रुपवर पूराचा मेसेज आला तेव्हा ३२ वर्षांचा गणेश साफी घरीच होता; आणि त्याला लक्षात आलं की, आपलं कुटुंब आणि घरातील अत्यावश्यक वस्तू सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी हाती अवघे दोन तास उरलेत. एका स्वयंसेवी संस्थेनं हिंदी भाषेत ती सूचना पाठवली होती, ज्यात ‘रातो’ नदीतील पाणी पातळी वाढत असल्याचं नमूद केलं होतं.
बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्याच्या सुरसंड तालुक्यात वसलेलं गणेशचं मूळ गाव—सरखंडियो बिठा. या गावाच्या उत्तरेला सुमारे २२० किलोमीटर अंतरावर, नेपाळच्या दक्षिणेकडील ‘तराई’ प्रदेशात मुसळधार पाऊस झाला होता.
आम्ही गणेशला भेटलो ते मे २०२५ च्या उन्हाळ्यातल्या एका कडक दुपारी. आंब्याच्या झाडाच्या सावलीत विसावलेल्या गणेशला आठ महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग आठवला, त्यानं आपली जुळी मुलं (एक मुलगा आणि एक मुलगी, वय ५ वर्षे), पत्नी नगीना देवी (वय २८), दोन शेळ्या आणि एक क्विंटल अन्नधान्य—गहू, डाळी आणि तांदूळ आपल्या शेजाऱ्याच्या सिमेंट-काँक्रीटच्या घरात हलवलं होतं. हे घर त्याच्या झोपडीच्या अगदी समोर होतं. पण ते एका उंच चौथऱ्यावर बांधलं होतं; पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी हा चौथरा जमिनीपासून सहा फूट उंचावर बांधलेला होता.
डोंगराळ ‘तराई’ प्रदेशात उगम पावणारी रातो नदी गणेशच्या गावातूनच वाहते. जेव्हा नदीच्या उगम क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा ते पाणी सरखंडियो बिठा गावापर्यंत पोचायला साधारणपणे दोन तास लागतात.
गणेश आणि त्याचं कुटुंब शेजाऱ्याच्या घरी दोन-एक दिवस राहिलं. त्या शेजाऱ्यानं तुमचा आनंदाने स्वीकार केला का? असा प्रश्न आम्ही केला तेव्हा गणेशनं उत्तर दिलं, “मग, का नाही? जर संकटाच्या वेळी शेजारीच मदतीला धावून येणार नाहीत, तर मग दुसरं कोण येणार?”
दरम्यान, बांबूचे खांब आणि गवत वापरून बांधलेल्या त्याच्या झोपडीत पुराचं पाणी ३ फुटांपर्यंत वाढलं होतं. पाणी ओसरलं तेव्हा जमिनीवर ठेवलेल्या प्रत्येक वस्तूवर म्हणजे अगदी त्यांच्या मातीच्या चुलीपासून ते भांड्यांवर चिखलाचा जाड थर जमला होता. ती झोपडी पुन्हा राहण्यायोग्य करण्यासाठी गणेशला एक आठवडा लागला आणि डागडुजी करण्यासाठी १०,००० रुपये खर्च करावे लागले; दिवसाला केवळ ४०० रुपये कमावणाऱ्या या भूमिहीन मजुरासाठी ही रक्कम खूपच मोठी होती.

















