तो तिला ‘मा’ म्हणतो, पण असुंता संजीवनीची आई नाही बरं.
असुंता टोप्पो या ग्रामीण आरोग्य संघटक (आरएचओ) आहेत. जवळपास दोन दशकांपासून धरमजयगढ तालुक्यातील मिरीगुडाच्या उपकेंद्रात त्या काम करत आहेत. काही वर्षांपूर्वी एका जोखमीच्या बाळंतपणाची जबाबदारी घ्यावी लागली होती. असुंता सांगते, आईचं ब्लड प्रेशर खूप वाढलेलं होतं आणि हिमोग्लोबिन सात ग्रॅमपेक्षा कमी होतं. “आमच्या उपकेंद्रात येण्याआधीच तिला कळा सुरू झाल्या होत्या. आम्ही तिला टेबलावर घेण्यापूर्वीच बाळाचा जन्म झाला होता.”
उपकेंद्र स्थानिक पातळीवर उपस्वास्थ्य केंद्र म्हणून ओळखलं जातं. उपकेंद्रात असताना बाळंतपणानंतर बाळाची तब्येत बरी नव्हती. “इथे आमच्याकडे ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध नव्हती आणि आईची तब्येतही तितकीच चिंताजनक होती,” असुंताना आजही सारं आठवतं. खूप रक्तस्त्राव होत होता. कळत नव्हतं की आईची काळजी घ्यावी की बाळाची?
"सगळ्यात आधी आम्ही त्यांना धरमजयगढला घेऊन गेलो. तिथे एक डॉक्टर होत्या, मला त्यांचं नाव सांगायचं नाही. त्या डॉक्टरने नाराजी व्यक्त करत उलट आम्हालाच विचारलं की आम्ही आई आणि बाळाला इतक्या गंभीर आणि गुंतागुंतीच्या अवस्थेत का आणलं म्हणून," त्या सांगतात. पण असुंता त्या डॉक्टरांशी भांडल्या. "मी त्यांना म्हणाले, की, तुम्हाला जमत नसेल तर सोडून द्या. मला जरा मदत करा. त्या डॉक्टर माझ्यावर चिडल्या."
असुंतानी बाळाला उचललं आणि रुग्णवाहिकेसाठी आग्रह धरला. दरम्यान, डॉक्टरीण बाईंना पाझर फुटला आणि त्यांनी एक इंजेक्शन दिलं. असुंता म्हणतात की त्यांच्यासोबत असलेल्या मितानिन (आशा कार्यकर्ती) ने खूप मोलाची मदत केली. बाळाला जिवंत ठेवण्यासाठी तोंडावाटे ऑक्सिजन ( प्राणवायू ) देत ती अक्षरशः झगडली.











