प्रत्येक लेखकाला एक गोष्ट कायम सतावत असते, “माझे शब्द कुणापाशी सुखरुप राहतील?”
बाकी सगळ्यांच्या आधी कुणी तरी एक त्या शब्दांचा पहिला वाचक असतं. श्रद्धानंद असुरसाठी गेली १८ वर्षं एका मित्राकडे त्याचे शब्द कायम सुखरुप राहिले आहेत.
“मी अथनासला वाचून दाखवतो,” तो सांगतो. “मी माझ्या आयुष्यातलं अगदी पहिलं गाणं लिहिलं ना तेही त्याच्यासाठीच. येशूचं गीत होतं ते.” असं म्हणत तो आपल्या जिवलग मित्राकडे पाहतो. हाच त्याचा पहिला श्रोता देखील असतो दर वेळी. आणि मग काही क्षणातच दोघं खदाखदा हसू लागतात.
श्रद्धानंद आणि अथनास हे दोघंही झारखंडच्या लुपुंगपाठ गावचे रहिवासी. लहानपणी दोघं दररोज एकत्र चालत शाळेत जायचे. असंच एक दिवस रोमन कॅथलिक प्रायमरी स्कूलजवळून जाताना श्रद्धानंदच्या लक्षात आलं की अथनास एकदम अस्वस्थ झालाय. “त्या दिवशी गाणं म्हणण्याची त्याची पाळी होती,” तो सांगतो. आणि या गाण्याला वर्षभराच्या तपासणीत गुण असायचे.
हे दोघं असुर आदिवासी आहेत. झारखंडमध्ये या जमातीची नोंद पीव्हीटीजी किंवा बिकट परिस्थितीतील आदिवासी समूहात केली जाते. अथनास जन्माला आला पण त्याच्या डाव्या हाताची वाढ पूर्ण झाली नव्हती. “सगळे जणं त्याला लूला किंवा ठुठा [लुळा किंवा थोटा] म्हणायचे,” हे सांगत असताना श्रद्धानंदच्या चेहऱ्यावरचं मगाचं हसू पूर्णच विरून जातं.














