लहानपणी, रजिथा खिडकीतून डोकावून आपल्या वडिलांना आणि आजोबांना लहान मुलांना प्रशिक्षण देताना पाहायची पण आपण त्यांच्यात का सामील होऊ शकत नाही असा तिला सारखा प्रश्न पडायचा. विशेषतः त्या बाहुल्यांनी तिचं लक्ष वेधलं होतं आणि काही ठराविक काव्यपंक्ती तिला खूप आवडायच्या.
३३ वर्षांची रजिथा सांगते, “माझ्या आजोबांनी माझी कठपुतळ्यांची आवड ओळखली आणि त्यांच्या काव्यपंक्ती मला शिकवण्यासाठी ते तयार झाले.”
रजिथा पुलावर शोरनूर इथं आपल्या कौटुंबिक स्टुडिओमध्ये एका लाकडी बाकावर बसून ‘थोलपावकोथ’ कठपुतळीचा चेहरा कोरतेय. तिच्या समोर टेबलावर आरी, छिन्नी आणि हातोडी यांसारखी लोखंडी अवजारं ठेवली आहेत.
दुपारची वेळ आहे आणि स्टुडिओमध्ये शांतता पसरलीये. जिथं कठपुतळ्या बनवल्या जातात त्या शेडमध्ये रजिथाच्या बाजूला फिरणाऱ्या पंख्याचाच फक्त आवाज येत आहे. बाहेर, एका मोकळ्या गच्चीवर, चामड्याचे तुकडे उन्हात वाळत ठेवलेत; त्यांच्यावर नक्षीकाम करून कठपुतळ्या बनवताना असं करणं गरजेचं असतं.
“या कठपुतळ्या आधुनिक विषयांवरील कार्यक्रमांसाठी बनवल्या जातायत,” असं रजिथा सध्या काम करत असलेली कठपुतळी दाखवत सांगते. थोलपावकोथ हा भारतातील मलबार किनारपट्टीवरील एक पारंपरिक कलाप्रकार आहे, जो मूळतः भद्रकाली देवीच्या वार्षिक उत्सवाच्या काळात मंदिराच्या आवारात सादर केला जात असे.














