आपण महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवतोय हे जेव्हा विनोद निकोलेंना समजलं, तेव्हा त्यांच्या नावे साधं बँक खातंही नव्हतं. त्यांच्या पत्नीने त्यांना १५,००० रुपये उसने दिले. त्या एका आदिवासी निवासी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमेल तशी मदत केली आणि निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी ५२,००० रुपये जमा केले.
विनोद निकोले यांच्यासमोर खूप आव्हानात्मक परिस्थिती होती. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी धनारे पास्कल जान्या हे विद्यमान आमदार होते, ज्यांनी २०१४ मध्ये डहाणू मतदारसंघातून १६,००० पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला होता. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवारहोते, असा पक्ष ज्याने त्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत अधिकृतपणे ८२ कोटी रुपयांहून अधिक खर्च केल्याचं मान्य केलं होतं.
हाती आलेल्या निकालांमध्ये निकोले ५,००० पेक्षा थोड्या कमी मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आले. सोयीसुविधांची कमतरता त्यांच्या यशाला अडवू शकली नाही.
“माझ्या चुलत भावाने मला ७०,००० रुपये उसने दिले होते. निवडणुकीपूर्वी माझ्याकडे असलेली रोख रक्कम फक्त तेवढीच होती,” असं निकोले सांगतात. पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यातील डहाणू शहरात आपल्या कार्यालयाबाहेर प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून ते मोकळेपणानं बोलत होते.
ही गोष्ट अशा भारत देशातली वाटते जो आता अस्तित्वात नाही. पण हे २०१९ मध्ये घडलं आणि पुन्हा २०२४ मध्येही. तो काळ असा होता जेव्हा भाजप एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकत विरोधकांना नमवत होता आणि राजकारण हा पैशाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ वाटत होता. या सर्व परिस्थिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) ४८ वर्षीय निकोले आपली आमदारकीची दुसरी टर्म सहजपणे पूर्ण करत आहेत. हे अशा राज्यात घडलंय जिथे ९३ टक्के आमदार करोडपती आहेत. एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.
निकोले यांचा जन्म डहाणू शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकी गावात झाला. एका वीटभट्टी कामगाराच्या घरात जन्मलेले निकोले हे महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार आहेत. महाराष्ट्र हे निवडणुकांवर सर्वाधिक खर्च करणारे राज्य म्हणून ओळखले जाते. निकोलेंकडे निवडणुकीपूर्वी वाटण्यासाठी पैसे नाहीत, किंवा आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी मोठी सोशल मीडिया टीम सुद्धा ते कामाला लावू शकत नाहीत. लोकांसोबत उभं राहून काम करणं, जनआंदोलनांमध्ये सहभाग घेणं आणि सामान्य लोकांसाठी, प्रामुख्याने आदिवासी शेतकरी आणि मजुरांसाठी नेहमी कार्यरत राहणं हीच त्यांची खरी संपत्ती आहे.









