“ये तो बचपन सेही तेज दौडती है,” लालदेव ओरान आपल्या १८ वर्षीय मुलीबद्दल अभिमानानं सांगतात. प्रियंका कुमारी उत्तम धावते.
लालदेव हा रोजंदारी करणारा इसम. चार मुलांचा बाप. प्रियंका कुमारी थोरली. बापाचं नाव रोशन करावं, या हेतूनं ही मुलगी एसएससी जीडी भरती परीक्षेची तयारी करतेय. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही परिक्षा घेतली जाते. ही परीक्षा पास झालं की, जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स इत्यादीत नोकरी मिळते.
“हमको वर्दी पहननी है!” प्रियंका कुमारी म्हणते. गरीब बापाच्या मुलीनं पाहिलेलं हे एक स्वप्नं आहे.
प्रियंका कसून तयारी करतेय. रोज धावतेय. धावणं हा एसएससी जीडी भरती प्रक्रिया उत्तीर्ण करण्यातला महत्त्वाचा भाग. पण तिचा हा सराव, निष्फळ ठरू शकतो. भरती प्रक्रियेत ती अपात्र ठरण्याची शक्यता दाट. कारण, प्रियंकाच्या दातांवरील डाग. निवड प्रक्रियेदरम्यान वैद्यकीय तपासणी होते. या चाचणीत दातांवर डाग असलेल्यांना बाद केलं जातं. हे डाग असतात 'फ्लोरोसिस'चे.
नोव्हेंबर महिन्यांत प्रियंकानं धावायचा सराव सुरू केलेला. पहिलं लक्ष्य होतं — साडेआठ मिनिटांत १६०० मीटर धावणं. “पहलेही दिन मे हम सात मिनटमेही उतना तेज दौड गए थे” प्रियंका अभिमानानं सागंते.
प्रियंकाचा स्पीड खरोखच उत्तम होता, पण पहिल्याच सरावानंतर तिच्या पायांतून दोरदार कळ उठली. गुडघे ठणकू लागले. लालदेवनं मुलीला पेनकिलरची गोळी देवू केली. पण प्रियंकानं ती नाकारली. “एकदा औषध घेतलं, की ती सवयच लागते,” प्रियंका म्हणते. आसपासच्या घराघरात तिनं लोकांना चॉकलेटगत पेनकिलरच्या गोळ्या खाताना पाहिलंय. ते तिला टाळायचं होतं.
प्रियंकाच्या गावाचं नाव चुकडू. हे गाव प्रामुख्यानं आदिवासींचं. गावकरी पितात त्या पाण्यात फ्लोराईड आहे, त्यामुळं गावातील घराघरात फ्लोरोसिसचे रूग्ण आहेत. हा आजार फ्लोराईडयुक्त पाण्यामुळं होतो. फ्लोराईड हा क्षारघटक नैसर्गिकरित्या खडक, माती नि भूजलात आढळतो. पलामू परिसरातील जमिनीत नीस व ग्रॅनाइट हे खडक आढळतात. या खडकांत फ्लोराईड हे खनिज असतं. अशा खडकांतून पाणी वाहतं, तेव्हा पाण्यात फ्लोराईड झिरपतं.




























