“घरातल्या नळाचं पाणी कधीकधी पिवळसर असतं, तर कधीकधी ते निळं, काळं किंवा फेसाळ असतं. पाण्याचा वास गटारासारखा येतो. आम्ही सहा महिन्यांपासून हेच पाणी वापरतोय,” पश्चिम दिल्लीच्या पीरागढी गावात राहणारा अन् शिंपीकाम करणारा २२ वर्षांचा रोशन सांगत होता. तो गेल्या तीन दिवसांपासून पोटदुखी आणि तापाने आजारी आहे. या चौकोनी कुटुंबातील कुणीतरी नेहमीच आजारी असतो.
देशाची राजधानी असलेल्या या शहराच्या बाहेर असलेलं पीरागढी गाव आता शहरातल्या वाढत्या वर्दळीने व्यापलंय, इथल्या अनेक रहिवाशांना नळाद्वारे येणारं दूषित पाणी पिल्यानंतर जठर आणि आतड्यांच्या समस्या किंवा तापासारख्या समस्यांचा सामना करावा लागतोय. जून २०२४ पासून, परिसरातल्या सुमारे १,००० घरांतील प्रत्येक व्यक्तीला महानगरपालिकेच्या पुरवठ्याद्वारे दुर्गंधीयुक्त पाणी मिळालंय.
पीरागढीच्या रस्त्यांवर डझनभर लहान-मोठे कारखाने होते. स्थानिक लोक म्हणतात की, सुमारे दोन दशकांपूर्वीपर्यंत इथे प्रामुख्याने प्लास्टिक वस्तूंचं उत्पादन करणारे युनिट्स होते. कालांतराने, विविध प्रकारचे रंग, शूज, इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटर आणि इतर गोष्टींचे उत्पादन करणारी औद्योगिक युनिट्स देखील उदयास येऊ लागली.
रोशनचे वडील विश्वनाथ इथल्या एका कारखान्यात रोजंदारीवर काम करतात. १५ वर्षांपूर्वी जेव्हा ते बिहारहून दिल्लीला स्थलांतरित झाले तेव्हापासून पीरागढी त्यांचं घर बनलं कारण या गावाने रोजगार, अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या.
विश्वनाथच्या कुटुंबाप्रमाणे, पीरागढीतील बहुतेक लोक त्यांच्या कुटुंबाच्या मासिक उत्पन्नापैकी जवळजवळ १० टक्के रक्कम स्वच्छ पिण्याच्या पाण्यावर खर्च करतात, ज्याचा सरासरी खर्च दररोज १०० रुपये आहे.














