रस्ता संपण्याआधीच जीपीएस सिग्नल गायब होतो.
नागपूरच्या दक्षिणेला तासाभराच्या अंतरावर असलेल्या भनसोली (सावंगी) गावाबाहेरील डांबरी रस्ता एका धुळीने भरलेल्या कच्च्या रस्त्यात विरून जातो, जो कापूस आणि तुरीच्या शेतातून वाट काढत पुढे जातो.
४५ वर्षांचे किरसान जगमाल रबारी मोटरसायकलवर आमची वाट पाहत आहेत. तुम्हाला तुमची कार इथेच सोडावी लागेल, असा ते आग्रह धरतात. त्यांच्या तांड्यात साधारण २,५०० मेंढ्या आणि शेळ्या आहेत. हा तांडा रस्त्यावरील एक उथळ ओढा ओलांडून पुढे गेला असून तिथे गाडीने पोहोचणे अशक्य आहे.
दुसऱ्या बाजूला, चार कुटुंबे—म्हणजे किरसानचा सतत फिरता 'डेरा'—प्रवासाला निघाले आहेत. दोन लोखंडी गाड्या धिप्पाड बैलांकडून ओढल्या जात आहेत, ज्यावर खाटा, स्टीलची भांडी, कपड्यांचं गाठोडं, घागरी, दोरखंड, जाळी आणि ट्रंक असे त्यांचे विविध सामान लादलेले आहे. पारंपरिक काळ्या रंगाच्या पोशाखातील (चोळी, घागरा आणि लुडकी/ओढणी) स्त्रिया या गाड्या चालवत आहेत. शेळ्या-मेंढ्यांची पिल्ले ओरडत आहेत, आणि एक कुत्र्याचे पिल्लू दोरीला हिसका देत आहे; जणू भविष्यात कळपाचे रक्षण करण्याच्या जबाबदारीचा तो सरावच करत आहे.
तांडा मार्गस्थ झाला आहे.












