“तेव्हा मी तरुण होते, मला कधीच वाटलं नव्हतं की आम्ही हा व्यवसाय बंद करू..”
राधा देवींच्या घरातल्या माळ्यावर धूळ खात पडलेली, दुर्लक्षित साधनं मात्र वेगळीच कहाणी सांगतात. एक चरखा आणि लाकडाची एक जुनाट धावती सांगत होती की कोणताही रंग न देता, नैसर्गिक लोकरीपासून घोंगड्या विणण्याच्या दशकानुदशकांच्या प्रवासात ते त्यांचे सोबती होते. आता मात्र ती साधनं अबोल होऊन पडली होती.
भोजपूरमधल्या सूत कातणाऱ्या आणि विणणाऱ्या बाई म्हणतात, “सूत बनावट की कला हमार हाथ से छुट जाता (सूत कातण्याची कला माझ्या हातांतून निसटत चालली आहे) २०१६ ला ती घोंगडी विणल्यानंतर मी दुसरी कुठलीच घोंगडी विणली नाही.” असं म्हणत त्या जाड तपकिरी रंगाच्या विविध छटांमध्ये विणलेल्या आणि तिच्यावर आडव्या पट्ट्या असलेल्या घोंगडीकडे बोट दाखवतात.
"मी अगदी लहान असल्यापासूनच हे करत आलेय, माझी आई, काकी आणि आजीच्या सोबतीनं. असं त्या वृद्ध विणकर बाईंनी सांगितलं. त्यांना स्वतःचं नेमकं वय आठवत नाही, पण त्या एवढं मात्र नक्की सांगतात, की “मी इंदिरा गांधींचा काळ पाहिलाय!”
एकेकाळी गरहनी तालुक्यातल्या भिनरारी गावातल्या गल्ल्यांमध्ये, मेंढ्यांच्या लोकरीचा एक वेगळाच ताल होता. हिवाळ्यातल्या बाजारांमध्ये, ‘पाल’ कारागिरांनी विणलेल्या घोंगड्या प्रत्येकाच्या हाती फिरत असत, रात्र मोठी असणाऱ्या कडाक्याच्या थंडीत त्या घोंगड्यांचे खरखरीत, जाडसर धागे लोकांना उबदार ठेवत. आज मात्र या बाजारपेठा शांत झाल्या आहेत आणि या गावात आणि त्यांच्या समाजात अशा प्रकारच्या घोंगड्या विणणाऱ्या राधा देवी आता एकट्याच राहिल्या आहेत.
राधा देवी म्हणतात, “इही जात बा हमार (हीच आमची जात आहे). सुरुवातीपासून आम्ही हेच करत आलोय.”
हिरवी-गुलाबी साडी नेसलेल्या राधा देवी आपल्या घराच्या उन्हाने कोमट झालेल्या विटांच्या भिंतीला टेकून उभ्या आहेत. त्यांना आठवतंय की, आठ-नऊ वर्षांच्या असतानाच त्या विणकाम कशा शिकल्या ते. त्या कधीच शाळेत गेल्या नाहीत आणि आपल्या आईकडून ही कला शिकल्या. त्यांचे वडील आणि आजोबा शंभराहून अधिक मेंढ्या पाळायचे. कुटुंबातल्या स्त्रिया जास्तीकरून लोकरीपासून घोंगड्या आणि स्वेटर्स विणत, तर पुरुष मंडळी जवळच्या गावांमध्ये किंवा अगदी इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन ते विकत. लग्नानंतरही त्यांनी हीच पद्धत पाहिली. त्यांचा नवरा आणि सासरा मेंढ्या पाळत आणि सासूबाई घोंगड्या विणत असत.












