५४ वर्षांचे किरण गहाला आणि त्यांच्यासारख्या इतर अनेक आदिवासी शेतकऱ्यांसाठी हा मोर्चा काही नवीन नाही.
१९ जानेवारी, २०२६ ला, ते पालघर जिल्ह्यातल्या डोल्हारी बुद्रुक गावातील आपल्या घरातून लाल टी-शर्ट आणि उपरणं घालून बाहेर पडले. इतर काही आदिवासी शेतकरी बसलेल्या टेम्पो-ट्रकमध्ये बसले अन् चारोटी गावाच्या दिशेने निघाले. अखिल भारतीय किसान सभेच्यामहाराष्ट्र शाखेने आयोजित केलेल्या आणखी एका भव्य मोर्चाची ही सुरुवात होती.
इथं हजारो शेतकरी जमले होते, माध्यमांच्या वृत्तांनुसार आणि अखिल भारतीय किसान सभेच्या अंदाजानुसार कदाचित पन्नास हजारांच्या आसपास हा जनसमुदाय असावा. त्यातील बहुतांश लोक पालघर जिल्ह्यातील आदिवासी समुदायातील आहेत. जमिनीच्या हक्कांची अधिक चांगली अंमलबजावणी, मनरेगा पुन्हा सुरू करणे, वाढवण बंदर प्रकल्प रद्दबातल करणे तसेच पिण्याच्या व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे, यासह इतर मागण्यांसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली होती.











