मी साबरपाड्यात पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. बंडुआन तालुक्यातील कुंचिया गावाच्या एका बाजूला रस्त्याच्या कडेला त्यांची अकरा घरं आहेत. सावर (ज्याला साबर देखील म्हणतात) समाजातील मातीच्या लहान घरांचा हा समूह आहे.
त्यांची घरं, अंधाराआड दिसतात, हळहळू दाट होत जाणाऱ्या आणि दुआरसिनी टेकड्यांमध्ये विलीन होणाऱ्या जंगलाची सुरुवात ह्या घरांपासून होते. साल, सेगून, पियाळ आणि पळस वृक्षांचे हे जंगल अन्न, फळं, फुळं, भाजीपाला आणि उपजीविकेचे साधन आहेत.
सावर समुदाय पश्चिम बंगालमध्ये विमुक्त जमाती (DNT) आणि अनुसूचित जमातीमध्ये समावेशित आहेत. वसाहती ब्रिटिश सरकारच्या गुन्हेगारी जमाती कायद्याने (CTA) ‘गुन्हेगार’ म्हणून ओळखल्या गेलेल्या अनेक जमातींपैकी ते होते. १९५२ मध्ये, भारत सरकारने हा कायदा रद्द केला आणि जमातींना आता विमुक्त जमाती (DNTs) किंवा भटक्या जमाती (NTs) म्हणून संबोधले जाते.
आजही साबरपाडा (साबरपारा म्हणून देखील ओळखले जाणारे) येथील कुटुंबे उदरनिर्वाहासाठी जंगलावर अवलंबून आहेत. २६ वर्षीय नेपाली साबर ही त्यापैकीच एक आहे. ती पुरुलिया जिल्ह्यातल्या तिच्या मातीच्या घरात नवरा घल्टू, दोन मुली आणि एका लहान मुलाबरोबर राहते. सर्वात मोठी मुलगीनऊ वर्षांची असूनही पहिल्या इयत्तेमध्ये आहे. दुसरी मुलगी लहान आहे आणि सर्वात लहान मुलगा अजूनही आईच्या दुधावर आहे. कुटुंबाची कमाई साल (शोरिया रोबस्टा) पानांवर अवलंबून असते.




