“त्याच्या सुळ्याचा एकच प्रहार आणि पीकभरली सात पोती अक्षरश: मातीमोल!’’
जवळपास अख्खं वर्ष उलटून गेलंय, तरी आपल्या दम्पारेंगपुई गावच्या घरातल्या त्या एकाकी हत्तीपायी झालेलं नुकसान रामपारा विसरू शकले नाहीयेत.
पीकभरली सात पोती म्हणजे मोहरीने शिगोशिग भरलेले पत्र्याचे पाच डबे. यांचं वजन साधारणपणे १० ते १२ किलो. अन्न साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोत्यांमधल्या धान्याचं प्रमाण किंवा वजन मोजण्यासाठी मिझोरममध्ये पारंपरिकरित्या पत्र्याच्या डब्यांचा संदर्भ दिला जातो.
“हत्तीने चाटलं त्यामुळे सगळी मोहरी आता खराब झालीय,’’ ते म्हणतात. पहाऱ्यासाठी म्हणून उभ्या केलेल्या बांबूच्या झोपडीत साठवून ठेवलेला सारा तांदूळही या हत्तीच्या केवळ जिभेच्या धक्क्यापायी उद्ध्वस्त होऊन गेलाय.
तब्बल ७३ पावसाळे बघितलेले रामपारा हे अत्यंत समंजस आणि क्षमाशील! “तो ‘मयंग’ [हत्ती] चांगला आहे… कधीच माणसांवर हल्ला करत नाही; फार तर पिकांची नासधूस करतो. तो येतो केवळ अन्नाच्या शोधात आणि मग आला तसा निघूनही जातो.’’ स्वत: शेतकरी आणि बांबूच्या हस्तकलेतले जाणकार असलेले रामपारा हे रियांग या आदिवासी समुदायाचे आहेत.
ते सांगतात, “लाजाळू आहे हा हत्ती. जेव्हा कधी त्याला मानवी आवाज ऐकू येतो, तेव्हा तो त्याचे लांब कान खाली पाडतो.’’ आता त्याचं शेतात घुसायचं प्रमाणही कमी झालंय. २०२२ आणि २०२३ मधे तो तीन-चारदा आला होता, २०२४ मधे दोनदा आणि २०२५ मध्ये फक्त एकदाच.















