कमलकोश या अत्यंत सुबकपणे विणलेल्या चटईचं मर्म जाणणाऱ्यांची संख्या विरळ आहे.
अन् ती प्रत्यक्ष विणणारे लोक तर त्याहूनही कमी.
पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात तयार होणाऱ्या या वेताच्या चटया अत्यंत बारकाव्यांनी नटलेल्या असतात. चप्पट केलेल्या वेताच्या बारीक पट्ट्यांपासून बनवल्या जाणाऱ्या या चटया, त्यांच्यावरील सांस्कृतिक चिन्हांमुळे इतर चटयांपेक्षा वेगळ्या आणि उठून दिसतात.
“एका पारंपरिक कमलकोश चटईवर कोला गाछ (केळीचं झाड), मोर, मंगल कलश आणि स्वस्तिक यांसारख्या शुभ चिन्हांचं नक्षीकाम केलेलं असतं,” प्रभाती सांगते.
कमलकोश चटया विणता येणाऱ्या मोजक्या विणकरांपैकी एक म्हणजे प्रभाती; तिने अगदी लहान वयात, म्हणजेच वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच, ही कला आत्मसात करायला सुरुवात केली. “या गावातला (घेगीरघाट) प्रत्येकजण अगदी लहान वयात चटया विणायला सुरुवात करतो,” ३६ वर्षीय प्रभाती सांगते. “माझी आई कमलकोश (कमळाच्या आकाराची नक्षी) अगदी काही भागांतच विणायची; पण माझ्या वडिलांना नक्षीकामाची उत्तम जाण होती. ते मला समजावून सांगायचे, ‘ही नक्षी अशा प्रकारे विणून बघ.’ त्यांना स्वतःला विणकाम करता येत नसलं तरी त्यांच्या चोख मार्गदर्शनातून आपल्याला खूप काही शिकायला मिळाल्याचं प्रभातीला वाटतं.
आम्ही तिच्या घेगीरघाट गावातल्या घराच्या ओसरीत बसलो होतो. या भागातील बहुतेक विणकर घराच्या ओसरीत काम करणं पसंत करतात. तिचं संपूर्ण कुटुंब तिच्या अवतीभोवतीच असतं आणि या हस्तकलेशी संबंधित विविध कामांमध्ये तिला मदत करतं. चटईच्या धाग्यांमध्ये नक्षीकाम हेच मुख्य काम आहे. म्हणजेच त्या नक्षीची संकल्पना मांडणं आणि ती प्रत्यक्षात साकारणं हे काम केवळ प्रभातीलाच जमतं. “आम्ही हे काम फक्त आमच्या स्मरणशक्तीच्या जोरावर करतो,” ती आपल्या नक्षीकाम करण्याच्या पद्धतीबद्दल सांगते.


























