“पाण्याला दुर्गंधी येते, पण आमच्याकडे पर्याय तरी काय आहे?”
कालिंदी कुंज घाटावर, नोएडा, दिल्ली आणि फरिदाबाद येथून येणाऱ्या हजारो लोकांपैकी एक बच्चा देवी सूर्य मावळू लागताच दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्यात जाण्याची तयारी करताना दिसते. सूर्य, पाणी, हवा आणि निसर्ग यांना समर्पित असलेले छठ महापर्व साजरे करण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सर्व गर्दी इथे जमली होती. दिल्लीत स्थलांतरित झालेले व मूळचे बिहारच्या खगरियाचे ४५ वर्षीय राजेश मंडल म्हणतात, “आमच्यासाठी छठ हा दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे.”
चार दिवस चालणाऱ्या छठ पूजेच्या तिसऱ्या आणि सर्वात शुभ दिवशी, विवाहित महिला सुमारे दोन तास कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला ‘संध्या अर्घ्य’ देऊन प्रार्थना करतात. ह्या पूजेसाठी दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील भाविकांना, धोकादायक प्रमाणात प्रदूषित झालेल्या यमुना नदीशिवाय पर्याय नाही.



















