“नवऱ्या मुलीच्या आईने मला सक्त ताकीद दिलीय- इतर काही नको, फक्त हाताने विणलेल्या दौऱ्या आम्हाला भेट म्हणून द्या,’’ हसत हसत चंद्रावती देवी सांगत असते. “महागड्या भेटवस्तू देणं काही आम्हाला शक्य नसतं, पण ही आमची पारंपरिक भेट आहे,’’ आपल्या भाचीच्या लग्नात द्यायच्या भेटवस्तूंचा संदर्भ देत ती सांगते.
ही ४५ वर्षीय चंद्रावती बनिया छापर गावची. वाळलेल्या मूंज गवताच्या दौरी नामक टोपल्या विणण्याचं खास कौशल्य तिच्यापाशी आहे. हस्तकलेतून आकाराला येणाऱ्या या टोपल्या म्हणजे इथल्या वधूंना दिली जाणारी एक लोकप्रिय भेट! शिवाय लग्नाच्या विधींमध्येदेखील या टोपल्या वापरण्याची या भागात रीत आहे. चंद्रावती शेतकरी आहे. तिच्यापाशी अर्धा बिघा शेती आहे. फावल्या वेळात ती टोपल्या विणते.
बहुपयोगी असते ही दौरी. “धान्य, मिठाई, पीठं किंवा भाज्या साठवायच्या तर आमच्याकडे कपाट नसतं. मग आम्ही त्यासाठी दौऱ्या वापरतो,” चंद्रावतीची १८ वर्षांची मुलगी पुष्पा सांगत असते.
बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातल्या त्यांच्या या घरात भिंतीच्या आधाराने मूंज गवताच्या गंजी लावून ठेवलेल्या असतात. डिसेंबर महिना असतो आणि नुकतंच हे रानगवत गोळा करून आणलेलं असतं. येत्या उन्हाळ्यातल्या कडक उन्हात हे वाळवलं जाईल.














