बशीर अहमद टेरू यांच्या संग्रहालयात काही अनोख्या वस्तू दिसतात. एक प्राचीन लाकडी खोगीर, जुनं यंत्रमाग, लाकडी पोलो मॅलेट, गवताची चप्पल, जुने चांदीचे दागिने, जीर्ण झालेले शिना काव्याचे हस्तलिखित, लग्नात महिलांसाठी दागिने म्हणून वापरले जाणारे पारंपरिक कंगवे आणि रोजच्या वापरातल्या काही प्राचीन वस्तू इथे तुम्हाला बघायला मिळतील.
बशीरभाई गुरेझ आणि द्रास खोऱ्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या दर्दशिन आदिवासी समुदायातील आहेत. गेल्या पाच वर्षांपासून, संपूर्ण गुरेझ खोऱ्यातील लोक त्यांच्या घरातील प्राचीन वारसा असलेल्या वस्तू आणि दैनंदिन वापराच्या इतर जुन्या वस्तू त्यांच्या दावर इथल्या घरातल्या दर्द-शिन संग्रहालयात ठेवण्यासाठी देताहेत.
"मी लोकांना त्यांच्या घरातल्या प्राचीन वस्तू फेकताना पाहिलंय. त्यांना वाटतं की या गोष्टी निरुपयोगी आहेत. ह्या लोकांनी कधी जुने कपडे जाळलेत तर कधी वापरात नसलेली शेतीची अवजारं फेकून दिलीयेत” ते सांगतात. म्हणूनच ज्या वस्तू जुन्या आहेत म्हणून पूर्वी फेकून दिल्या जात होत्या किंवा जाळून टाकल्या जात होत्या, त्या वस्तूंना बशीरभाईंच्या संग्रहालयामध्ये त्यांची हक्काची जागा मिळाली आहे.
राज्य आरोग्यसेवा कर्मचारी म्हणून केलेल्या कामाचीच आपल्या माणसांच्या इतिहासाचं संग्रहालय तयार करण्यात मदत झाली आहे असं ४४ वर्षीय बशीर भाई मानतात. ते म्हणतात की लोकांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने संग्रहालय तयार करण्याचं काम खूप सोपं झालं. हिवाळ्यातील बर्फामुळे काश्मीरच्या गुरेझ खोऱ्यामधील रहिवाशांचा वर्षातील सहा महिने जगापासून संपर्क तुटतो आणि राज्यातील आरोग्य सुविधा देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. बशीर यांच्यासारख्या सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांचं काम त्यामुळेच फार मोलाचं आहे आणि लोकांचा त्यांच्यावर अगदी पूर्ण विश्वास आहे.


















