“शील कटा-वू S S!”
दुपारचे साडेबारा वाजलेत. उत्तर सोनारपूरपाशी वसलेल्या गारियात लालबाबू महतोंचा तो मोठा आणि धारदार आवाज दणाणून उठतो. त्यांचा आवाज सोडून, कोलकातातल्या या परिसरात जवळच्या बाजारातल्या काही वायफळ गप्पांचा आवाजही ऐकू येतोय.
"शील कटा ओ!" ते पुन्हा मोठ्यांदा म्हणतात. शील-नोरा कोरून घेणारं एखादं गिऱ्हाइक मिळेल या आशेने ते गल्लीतून वेगाने चालतात. शील म्हणजेच दगडी पाटा आणि नोरा म्हणजेच पाट्यावर हाताने वाटण्याचं साधन म्हणजे वरवंटा. बंगालमध्ये शील काटाओ हे ग्रॅनाइटच्या दगडावर नक्षीकाम करण्याचं एक पारंपरिक काम आहे. शील-नोरा हा सील बट्टा किंवा तमिळमधील अम्मी कल्लू चा एक प्रकार आहे. त्याचा उपयोग कच्चा मसाला बारीक करून त्याचं ओलसर, सुगंधी वाटण किंवा बारीक पावडर बनवण्यासाठी केला जातो. हे भारतीय स्वयंपाकघरातलं एक महत्त्वाचं अंग आहे. भारतीय स्वयंपाकी मानतात की, जेव्हा (नोरा) वरवंट्याचा स्थिर दाब कठीण पाट्यावर (शील) पडतो, तेव्हाच औषधी वनस्पतींचा आणि मसाल्यांचा अस्सल स्वाद वाटणात उतरतो.
“मसाला चांगला वाटला जाणं हेच पाटा-वरवंट्याचं मुख्य काम आहे. कोणताही आकर्षक मिक्सर तुम्हाला यासारखी गुणवत्ता देत नाही,” हे स्वयंपाकघरातलं महत्त्वाचं साधन आहे आणि याविषयी लालबाबूंचं हे ठाम मत आहे.
बिहारच्या सिवान जिल्ह्यातून कोलकात्याला स्थलांतरित झालेले लालबाबू म्हणतात, “शील कटाओ' म्हणजे दगडावरचं कोरीवकाम एक व्यवसाय म्हणून स्वीकारणारी लोकं आता क्वचितच आढळतात. या व्यवसायातली आमची ही शेवटची पिढी. १० वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा इथं आलो, तेव्हा एकट्या किडरपूरमध्येच आमच्यासारखी २५० माणसं होती. आता त्यातली बरीचशी मंडळी निवृत्त झाली, त्यांची म्हातारपणं सुरु झाली, असं कष्टाचं काम करणं अवघड होत जातं.”












