“गावातले लोक आता मला चांगलं ओळखतात.”
गणेशनला ग्राहकांशी मायेनं वागताना मी पाहिलं आहे. प्रत्येकाशी तो कसं बोलतो तेही पाहिलं आहे. जितके दिवस मी त्याच्यासोबत फिरलो; त्यात मी त्याला कुणाशीच चिडून बोलताना पाहिलं नाही. ग्राहकांशी आदरानं बोलल्यामुळेच गेली ४० वर्ष हा व्यवसाय करू शकल्याचं गणेशननं मला सांगितलं.
गणेशन ज्या गावात जातो तिथले लोक त्याला ‘नगराथार’ म्हणजेच नगरम गावचा रहिवासी म्हणतात. त्याला गावातले सगळे रस्ते माहिती आहेत. आठवड्यातून एकदा जाणाऱ्या गणेशनची गावातले लोक वाट पाहतात असं तो सांगतो. केवळ त्याच्याकडूनच खरेदी करणारे काही लोक गावात आहेत. भाव करणं त्याला आवडत नाही. “त्यांना किंमत परवडत असेल तरच मी वस्तू विकतो नाहीतर नाही. जर मी शंभर रुपयाला खरेदी केलेली वस्तू किमान ११० रुपयांना विकली गेली तर ठीक; नाहीतर मी ती विकत नाही.”
“मी जिथून खरेदी करतो ते न्यू डीलक्स दुकान पुडुक्कोट्टाई जिल्ह्यातल्या अरंथगी गावात आहे. मी नेहमी त्याच दुकानातून खरेदी करतो, दुसरीकडे कुठे जात नाही. 1980 मध्ये त्यांनी मला 1400 रुपयांच्या वस्तू दिल्या होत्या; आता त्यांची किंमत 7000 रुपये झाली आहे,” गणेशन म्हणाला. रोजची कमाई साधारण दोनशे रुपये असल्याचं गणेशननं सांगितलं. “एखाद्या दिवशी काहीच विक्री होत नाही. त्यामुळे कमाईही होत नाही,” असं तो म्हणाला.