आता पाऊसपण बदललाय. “मी इथं ३० वर्षे राहतीये, पण याआधी असा पाऊस कधी पाहिला नव्हता. तो एकदम येतो, मुसळधार कोसळत राहतो. दरवर्षी तो आम्हाला माळीणची आठवण करून देतो.”
ही भीती काल्पनिक नाही. हवामान उष्ण होत असल्याने, वातावरण अधिक ओलावा साठवून ठेवतं. “पावसाचं प्रमाण आणि पावसाची वेळ बदललीय. एकेकाळी तीन महिन्यात जितका पाऊस पडायचा तो आता फक्त दोन आठवड्यांत पडतो,” असं गोखले इन्स्टिट्यूटमधील सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. गुरुदास नुलकर म्हणतात. ते पुढे सांगतात की, पावसाचं बदललेलं स्वरुप आणि अनियंत्रित बांधकामं ही भूस्खलनाचा धोका वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. (वाचा : ठाण्यामध्ये पाऊस बिथरलाय - PARI)
पसारवाडीच्या उतारावर खाली, फसाबाईंचे शेजारी जावजी बालचिम घरांच्या मागे पडलेल्या मोठ्या दगडांकडं बोट दाखवतात, ते जावजींच्या गुडघ्यांपर्यंत आणि काही तर त्यांच्या मांडीपर्यंत उंच होते. "हे दगड मागच्या वर्षीच खाली आले," असं हा ८० वर्षांचा वृद्ध शेतकरी सांगतो. "छोटे दगड झाडांमध्ये अडकले आणि हे मोठे दगड खाली आले. नशीब चांगलं, त्यांनी अजून कोणाचं घर चिरडलं नाही."
पसारवाडीतली घरं हलक्या, मातीच्या विटांनी बांधलीयेत. एकेकाळी माळीणमध्ये उभ्या असलेल्या असुरक्षित घरांसारखीच ती दिसतात. दहा वर्षांनंतरही इथल्या कुटुंबांची पायाभूत व्यवस्था सक्षम झालेली दिसत नाही. उतारावरून पडणारे दगड रोखण्यासाठी टेकडीच्या बाजूला लावलेल्या लाकडी कुंपणांवरच त्यांची अखेरची आशा टिकून आहे.
"आधी असं नव्हतं. पण जेव्हापासून रस्त्याचं काम चालू झालं, तेव्हापासून पूर्ण उतारावरची माती सैल झालीय," असं जावजी म्हणतात. "ते सारखं खोदकाम करतात अन् माती टाकतात. आम्ही आमचं पूर्ण आयुष्य इथं घालवलंय. आता आम्हाला आमच्या घरातही सुरक्षित वाटत नाही." जावजी आणि त्यांची पत्नी यमुनाबाई त्यांच्या एका गुंठ्यापेक्षा कमी (०.०२५ एकर) शेतात २-३ क्विंटल तांदूळ पिकवतात. ते शेतमजुरी करून आणि पुण्याहून मुलांनी पाठवलेल्या पैशांनी आपल्या उत्पन्नाला हातभार लावतात.
यमुनाबाई बालचिम हळू आवाजात बोलतात. "आमची पोरं आता पुण्यात राहतात. जमिनीला पडलेल्या भेगा आणि गाव दबल्या जाण्याच्या भीतीनं ते गावात परत यायला नाही म्हणतात. या दोन खोल्या त्यांच्यासाठी बांधल्या होत्या, पण आता फक्त आम्ही दोघं, म्हातारे इथं राहतोय."