धर्मनगर हे त्रिपुरातील एक शहर. इतर कुठल्याही शहरासारखंच. तशीच ट्रॅफिक नि हॉर्नचा कर्णकर्कश पें पें. अशा या शहराच्या अगदी मध्यात आहे – 'बोरो कालिबारिर दिघी'. हे इथल्या तलावाचं नाव. या तलावाच्या मधोमध आहे महादेवाची भव्य मूर्ती. संध्याकाळ होताच या शिवशंकराचा नूर पालटतो. असं वाटतं जणू शिवजी डोळे मिटून संगीत ऐकण्यात मग्न झालेत. स्थानिक असोत की पर्यटक, सर्वांचीच पावलं तलावाकडं वळू लागतात. सर्वांनाच तलावाकडून येणारी सुमधुर धून आपल्याकडे खेचते.
तलावाजवळ एक साठीचा माणूस बसलेला दिसतो. त्याच्या हातात सतारसारखं दिसणारं वाद्य. मोराची असते तशी या वाद्याला सुरईगत लाब मान. या अरूंद पट्टीवर त्याचा एक हात सराईतपणे फिरतो नि दुसऱ्या हाताची बोटं तारा छेडतात. एकामागून एक लोकप्रिय लोकगीतांच्या चाली वातावरण भारून टाकतात. त्या ऐकण्यासाठी जमलेल्या गर्दीला ना हे वाद्य ठाऊक असतं, ना तो कलाकार. त्रिपुरामधील अनुसूचित जातीत समाविष्ट असलेल्या माली समाजातील हा कलाकार आहे नि याचं काही नावही आहे याचा तर लोकांना विसरच पडतो. कारण त्यानं छेडलेली धून नावगाव विसरायला लावते, ऐकणारांना मंत्रमुग्ध करते.
पण या चौकापासून अवघ्या १५ किलोमीटरवर, उत्तर त्रिपुरात जा. तेथील कदमताला तालुक्यात, 'दोतारा' वाजवणारा बेस्ट कलाकार कोण म्हणून विचारा, कुणीही एकच नाव घेईल – सरला गावचा रतीश मलाकार.













