तो आपली डुगडुगणारी व्हीलचेअर जवळ ओढतो आणि हॉस्पिटलच्या त्या जुन्या बेडसमोर लावतो, ज्यावर सध्या त्याचं आयुष्य अडकलं आहे. छताच्या लाकडी वाशाला टांगलेला एक जाडाभरडा कापडाचा तुकडा त्याने डाव्या हाताने घट्ट धरला आहे. उजव्या हाताने स्वतःचं शरीर बेडवरून ढकलत तो हळूच व्हीलचेअरवर सरकतो. त्यानंतर, दोन्ही हातांनी एक-एक पाय धरून तो खाली ओढतो, जोपर्यंत त्याचे पाय व्हीलचेअरच्या पायथ्याशी स्थिरावत नाहीत. हे काम तो ज्या सराईतपणे करतो, त्यावरून त्याने हे काम हजारो वेळा केले असावे हे स्पष्ट होते. अगदी तशाच सराईतपणे, ज्या सहजतेने तो बिलिगिरीरंगना हिल्सच्या जंगलातील उंच झाडांवर चढत असे... तोपर्यंत…


Chamarajanagar, Karnataka
|THU, MAR 19, 2026
बीआर हिल्सचा पंख तुटलेला पक्षी
कर्नाटकातल्या बीआर हिल्समध्ये उंच झाडांवरून मध काढणारा एक तरुण सोलिगा आदिवासी, एका भयानक अपघातानंतर आता आपल्या हरवलेल्या गाण्याचा शोध घेत आहे
Author
Editor
Photo Editor
Translator

M. Palani Kumar
“संध्याकाळचे साधारण सहा वाजले होते. पाऊस पडत होता. झाडाचं खोड थोडं निसरडं झालं होतं. एका 'तारे मारा' (बेहडा) च्या झाडावर मोठे मधाचे पोळे होते. ते कापण्यासाठी मी त्याच्याच शेजारी असलेल्या 'होन्ने मारा' (असन) च्या झाडावर चढलो होतो. ही झाडं खूप मोठी असतात. खूप उंच.” अरुण कुमार ज्या झाडांबद्दल सांगत आहे, ती १३० फुटांपर्यंत उंच वाढू शकतात.
“माझ्या हातात धुराची मशाल होती, पण मधमाशा मला चावत होत्या आणि मला पटकन खाली उतरायचं होतं. अचानक माझा पाय निसटला आणि मी २५ फुटांवरून थेट खाली जमिनीवर पाठीवर पडलो.” तो १२ मे २०२४ च्या त्या भयानक संध्याकाळबद्दल सांगतोय - ज्या दिवशी तो शेवटचा स्वतःच्या पायावर उभा होता.
अरुण आपल्या हातांनी ती जुनी व्हीलचेअर ८ x १० फुटांच्या पत्र्याच्या शेडच्या लहान दरवाजातून बाहेर काढतो. दरवाजातून येणाऱ्या अल्प प्रकाशामुळे तिथे थोडा उजेड आहे, अन्यथा तिथे अंधारच असतो. ही शेड विटा आणि मातीच्या घराच्या एका बाजूला जवळजवळ लपलेली आहे, जिथे त्याचे कुटुंब राहते. घराच्या दुसऱ्या बाजूला खांबावर कबुतरांची घरटी आहेत, जिथे त्याचे वडील पाळत असलेली काही कबुतरे राहतात.

Pratishtha Pandya

M. Palani Kumar
“मदत करायला कोणी नसतं. सकाळी मी स्वतःला या खोलीतून बाहेर काढतो आणि उन्हात जाऊन बसतो,” २४ वर्षांचा अरुण सांगतो. तो आपली व्हीलचेअर खोलीच्या मागच्या मोकळ्या जागेकडे वळवतो. तिथल्या सिल्वर ओक झाडांच्या फांद्यांमधून कोवळे ऊन नुकतेच जमिनीवर उतरले आहे.
साधारणपणे, वर्षाच्या या काळात अरुणने आपल्या कुटुंबाला या झाडांच्या वरच्या फांद्या छाटायला मदत केली असती, जेणेकरून कॉफीच्या रोपांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. पण यंदा त्यांना मजुरांवर अवलंबून राहावे लागत आहे. मजूर महाग असल्यामुळे झाडांच्या फांद्या न छाटल्या गेल्याने त्या अस्ताव्यस्त वाढल्या आहेत.
अरुण हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हात येऊन बसतो.
“हंगामात थोडेफार पैसे कमावण्यासाठी मी मध गोळा करायला जायचो. हा हंगाम एप्रिल ते जून दरम्यान फक्त पाच ते सहा आठवडे चालतो,” तो सांगतो. “उन्हाळ्यात बाहेर कुठेच काम नसायचे. घरी सुद्धा पैशांची चणचण असायची. म्हणून आम्ही चार-पाच मित्रांनी मिळून एक गट बनवला आणि घरखर्चाला हातभार लागेल इतकी थोडी कमाई करण्यासाठी हे काम सुरू केले.” या लहानशा कमाईतून त्यांच्या घराला आधार मिळायचा.

Courtesy: Arun
“मला मित्रांसोबत फिरायला आवडायचं, पण वर्गात काय शिकवलं जायचं यात माझं फारसं लक्ष नसायचं. म्हणून मी सातवीतच शाळा सोडली,” अरुण सांगतो. “इतर मुलांना पाहून मी झाडावर चढायला आणि मध काढायला शिकलो. सुरुवातीला भीती वाटायची, पण नंतर सवय झाली. लोक सहसा 'जेनू कुय्यो हाडू' (मध गोळा करतानाचे गाणे) गात झाडांकडे जातात. मी ते गाणे कधीच शिकलो नाही.” सोलिगा जमातीचे लोक पारंपारिकरीत्या मध गोळा करण्यात निष्णात असतात. मात्र अरुणचे ५३ वर्षीय वडील एम. सन्नरंगे गौडा यांनी हे काम फार काळ केले नाही.
गौडा हे चामराजनगर जिल्ह्यातील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. १९७० च्या दशकात सरकारने सोलिगा आदिवासींना जंगलातील 'पोडू' (लहान वस्त्यांमध्ये) स्थायिक होण्यास आणि फिरती शेती थांबवण्यास सांगितले. यलंदूर तालुक्यातील मुत्तुगडगड्डू पोडूमध्ये मिळालेल्या दोन एकर जमिनीवर त्यांचे कुटुंब १९७४ पासून शेती करत आहे.

Courtesy: Arun
“आम्ही आधी पावटा, ज्वारी, तूर आणि नाचणी पिकवायचो. पण हत्ती आणि डुकरं ही पिकं फस्त करायची. म्हणून १९९० च्या दशकात आम्ही कॉफीच्या शेतीकडे वळलो,” गौडा सांगतात.
शाळा सोडल्यानंतर अरुण आपल्या वडिलांना शेतीत मदत करायचा – रोपे लावणं, फांद्या छाटणं, परिसर स्वच्छ करणं, खुरपणी करणं आणि कॉफीच्या बिया तोडणं. तो इतर छोटी मोठी कामे करून पैसे कमावण्याचा प्रयत्न करायचा. “मला जे काम मिळेल ते मी करायचो—झाडं तोडणं, लाकूड कापणं, मध गोळा करणं, 'पाची' (दगडफूल) गोळा करणं. काही दिवस मला १००० रुपये सुद्धा मिळायचे, पण हे उत्पन्न कधीच कायमस्वरूपी नसायचं.”
“तरुण सोलिगांना बाहेर काम मिळत नाही. त्यांच्याकडे इतर कौशल्ये नाहीत आणि शिक्षणामुळे नोकरी मिळेलच याची खात्री नाही,” असे सामाजिक कार्यकर्ते आणि या समाजातील पहिले पीएचडी धारक डॉ. सी. मादेगौडा सांगतात.
वयाच्या १८ व्या वर्षी अरुणने स्थलांतर करायला सुरुवात केली. सुरुवातीला बंगळुरूमध्ये बांधकाम मजूर म्हणून आणि नंतर कर्नाटक आणि केरळमधील कॉफी आणि मिरीच्या मळ्यांमध्ये तो कामाला जायचा. काढणीचा हंगाम संपल्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये तो गावी परतायचा.
हेच महिने त्याच्या गावात मध गोळा करण्याचे महिने असायचे.

M. Palani Kumar

M. Palani Kumar
“प्रत्येक वेळी जंगलात गेल्यावर मधाचे पोळे मिळतेच असे नाही. आणि हंगामात आम्ही रोज जंगलात जात नाही. महिन्यातून फक्त चार-पाच वेळा जातो. आम्ही सकाळी १५ किलोमीटरच्या परिसरात मधाची पोळी शोधायला जायचो, घरी यायचो आणि मग संध्याकाळी मध काढण्यासाठी पुन्हा तिथे जायचो. पण अनेकदा आम्ही दोन-तीन दिवसांचे जेवण सोबत घेऊन जंगलात खूप आतपर्यंत जायचो,” अरुण सांगतो.
त्यांची कमाई त्यांना मिळणाऱ्या पोळ्यांच्या संख्येवर आणि आकारावर अवलंबून असायची. एका फेरीत ते ६० ते ७० किलोपर्यंत मध गोळा करू शकत. घरी आल्यावर ते स्वच्छ कापडाने मध गाळून कॅनमध्ये भरायचे. त्यानंतर एका एजंटला तो २०० ते ३०० रुपये किलो दराने विकला जायचा आणि आलेले पैसे सर्व मित्रांमध्ये समान वाटले जायचे.
“माझे तीन मित्र माझ्यासोबत होते.” त्या दुर्दैवी दिवसाची आठवण काढत अरुण सांगतो, “पडल्यानंतर मी उठण्याचा प्रयत्न केला. पण मी पाठीवर पडलो होतो आणि वेदना असहाय्य होत्या. माझी हाडं मोडली होती. मी अजिबातच हालचाल करू शकत नव्हतो. रात्र झाल्यामुळे माझे मित्र तासनतास माझ्यासोबत तिथेच थांबले, त्यांनी जंगली श्वापदांपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली. सकाळी गावची माणसे आली आणि मग रुग्णवाहिकेने मला दवाखान्यात नेले.” जवळच असलेल्या विवेकानंद ट्रायबल हेल्थ सेंटरमध्ये (VTHC) त्याला नेण्यात आले.

M. Palani Kumar
“त्या सकाळपासून दवाखान्याच्या चकरा सुरू झाल्या, त्याला आता बराच काळ लोटला आहे,” त्याचे वडील सांगतात. VTHC च्या डॉक्टरांना आढळले की अरुणच्या कंबरेखालच्या भागातील संवेदना पूर्णपणे गेली आहे. त्याच्या मणक्याला गंभीर इजा झाली होती. “त्यांनी आम्हाला चामराजनगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (CIMS) मध्ये पाठवले. तिथे डॉक्टरांनी सांगितले की त्याचे हाड अडकले आहे आणि ऑपरेशन करावे लागेल. तसेच एक नस सुद्धा कापली गेली होती. हॉस्पिटलने रिपोर्ट्स स्वतःकडेच ठेवले. आम्हाला फक्त औषधे आणि इंजेक्शन दिले गेले,” सन्नरंगे गौडा सांगतात.
CIMS मध्ये तुटलेली मणक्याची वाहिनी (spinal canal) जोडण्यासाठी आणि नसांना होणारी पुढची इजा रोखण्यासाठी शस्त्रक्रिया झाल्यावर, अरुण पुन्हा VTHC मध्ये परतला. तिथे डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबातील काळजी घेणाऱ्या व्यक्तींना आणि अरुणच्या तरुण पत्नीला प्रशिक्षण दिले.

M. Palani Kumar

M. Palani Kumar
त्यांच्या लग्नाला जेमतेम सहा महिने झाले होते जेव्हा हा भीषण अपघात घडला. "त्याची पत्नी त्याची पूर्ण काळजी घ्यायची, जोपर्यंत..." अरुणची आई मसनम्मा (४५) हे वाक्य पूर्ण करू शकली नाही.” आम्ही दिवसभर जंगलात असतो. तो घरीच असतो, मोबाइल बघत बसतो. पूर्वीसारखे मित्र आता त्याला भेटायला येत नाहीत. तो कंटाळतो, त्याला असहाय्य वाटते. मी काहीच करू शकत नाही. फक्त काळजी वाटते, दुसरं काय," ती म्हणते.
"डॉक्टरांनी माझ्या आई-वडिलांना काय सांगितले मला माहित नाही. मला मात्र त्यांनी सांगितले की मी पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेन. त्यांनी मला चालण्याचा प्रयत्न करायला सांगितले. पण तिथे कशाचाच आधार नव्हता, म्हणून मी प्रयत्न केला नाही," अरुण सांगतो. बोलता बोलता त्याची बोटे व्हीलचेअरच्या डाव्या हातावर ठेवलेल्या कॅथेटर बॅगच्या प्लास्टिक नळीशी चाळा करत आहेत.
शस्त्रक्रियेनंतर लवकरच अरुणला लघवी रोखली जाण्याचा (urine retention) त्रास सुरू झाला. VTHC च्या डॉक्टरांनी तो सोडवण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. अरुणच्या पोटाच्या खालाच्या भागात वेदनादायक सूज जाणवत होती. जून २०२४ मध्ये पुन्हा दवाखान्याच्या चकरा सुरू झाल्या. आधी CIMS आणि नंतर म्हैसूरच्या के.आर. हॉस्पिटलमधील तज्ज्ञांकडे त्याला नेण्यात आले, तिथे पाच दिवस उपचार करून त्याला घरी सोडले.

M. Palani Kumar

Pratishtha Pandya
जुलै आणि ऑगस्टमध्ये हा त्रास वारंवार होत राहिला. प्रत्येक वेळी अरुणला काही दिवस म्हैसूरमध्ये उपचारांसाठी भरती करावे लागे. अनेकदा त्याला संसर्ग (infection) व्हायचा, ज्यासाठी अँटीबायोटिक्स द्यावी लागायची. कधीकधी त्याचा रक्तदाब वाढायचा, ज्यामुळे चिंताशामक औषधे द्यावी लागायची. त्याची काळजी घेणे आता अधिक कठीण होत चालले होते.
"एकदा का लघवीचा त्रास सुरू झाला की आम्हाला म्हैसूरला वारंवार जावं लागलं," अरुणचे वडील सांगतात. "सरकारी रुग्णालयात उपचार मोफत आहेत, पण चामराजनगरला जाण्यासाठी गाडी ३,००० रुपये घेते आणि म्हैसूरसाठी ५,००० रुपये. त्यात जेवण आणि राहण्याचा खर्च मिळवला तर... प्रत्येक खेपेला किमान १०,००० रुपये खर्च येतोच."
सरकार अरुणसारख्या लोकांसाठी फार काही करत नाही, असे डॉ. मादेगौडा म्हणतात. "वाघाची शिकार किंवा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर २० लाखांपर्यंत भरपाई मिळू शकते. सोसायट्यांमध्ये गंभीर अपघात आणि आरोग्यासाठी विमा असतो. पण मध काढताना झाडावरून पडलात, तर विमा नाही की भरपाई नाही." बी.आर. हिल्ससह संपूर्ण भारतातील आदिवासी वन-संकलकांना या समस्यांना तोंड द्यावे लागते. "अरुणच्या आधी, केरेडिंबा पोडूतील आणखी एक मुलगा झाडावरून पडला आणि त्याने आपला पाय गमावला." सहकारी संस्था कधीकधी २,००० - ३,००० रुपये भरपाई देतात, पण जगण्यासाठी ते कधीच पुरेसे नसते.

Pratishtha Pandya
"डॉक्टर (अरुणची समस्या) फक्त अंशतःच ठीक करू शकले," त्याचे वडील सांगतात. "के. आर. हॉस्पिटल म्हणते की त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागतील. आमच्याकडे पैसे नाहीत. आता VTHC चा एक डॉक्टर दर तीन महिन्यांनी येऊन त्याचे कॅथेटर मोफत बदलून देतो. जेव्हा गंभीर अडथळा (blockage) येतो, तेव्हा आम्हाला चामराजनगरला जावेच लागते."
अरुणच्या आयुष्याचा नेहमीची लय आता पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
"मी सकाळपासून फक्त इथेच बसून असतो, कधीकधी आपली खुर्ची ओढत मुख्य गेटपर्यंत नेतो. किंवा थोडा वेळ उन्हात बसतो. मग पुन्हा खोलीत येतो. पूर्वी सगळे एकत्र (मुख्य घरात) असायचो. दुखापत झाल्यापासून - कोणीच नाही. मी मोबाइलवर काहीतरी बघत राहतो. ही शेड आधीच बांधलेली होती. इथे फिरणे सोपे जाईल असे वाटल्याने मी इथे राहायला आलो. पण मदत करायला कोणीच नाही. मी आता जसा आहे, तसा मला स्वतःलाच आवडत नाही."
"माझी पत्नी देखील मला सोडून गेली," अरुण सांगतो. "ती माझी काळजी घ्यायची. पण जेव्हा परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाही, तेव्हा ती निघून गेली. एकदा तिने फोन केला आणि म्हणाली, 'जेव्हा तू बरा होशील, तेव्हा मी परत येईन.' तिला जाऊन आता तीन महिने झाले आहेत." अरुणचा आवाज त्याच्या शरीरासारखाच हळवा आणि क्षीण झाला आहे.

M. Palani Kumar

M. Palani Kumar
"मी त्याला नाश्ता, जेवण देते," अरुणची आई सांगते. "मीच त्याला अंघोळही घालते. त्याला स्वच्छतागृहात जायचे असेल तर त्याचे वडील ते सांभाळतात." त्याच्या खोलीत टांगलेली प्रौढांच्या डायपर्सची पिशवी मला दिसते. "आम्ही त्यावर दरमहा १,५०० रुपये खर्च करतो," असे त्याचे वडील सांगतात.
"त्याच्या बहिणी दिवसातून ५-१० मिनिटेच त्याच्याशी बोलतात, त्यांना कॉलेजचे काम असते." त्याची आई थोडा वेळ थांबते आणि म्हणते, "आम्ही फक्त इतकीच अपेक्षा करतो की त्याने थोडेफार चालावे आणि स्वतःचे काम स्वतः करावे."
"पण त्यासाठी आपल्याला मोठ्या हॉस्पिटलची गरज आहे," त्याचे वडील पटकन म्हणतात.
"मी आता त्याला पुन्हा भरती करणार नाही," ती जरा रुक्षपणे म्हणते. "मागच्या वेळी आम्ही केले, पण काहीच बदलले नाही. मी हे सर्व पुन्हा करायला तयार नाही."
"माझ्या पत्नीला रुग्णालये आवडत नाहीत, म्हणून ती..." गौडा स्पष्टीकरण देऊ लागतात.

M. Palani Kumar

M. Palani Kumar
"तिथे त्याची काळजी कोण घेणार?" गौडांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच मसनम्मा विचारते. "कोणीही नाही. जर आम्ही गेलो, तर इकडे लक्ष द्यायला कोणीच नाही. आम्हाला हे शक्य नाही. हे आमच्यासाठी खूप कठीण आहे." आणि ती अचानक उठून मळ्याच्या कामासाठी निघून जाते. कदाचित आपल्या कष्टाच्या कामात ती तिच्या दुःखावर उतारा शोधत असावी.
अरुण आता कामावर परत जाऊ शकत नाही. त्याला आता फक्त प्रतीक्षा करायची आहे. कोणीतरी आपली विचारपूस करण्याची प्रतीक्षा. वेळ निघून जाण्याची प्रतीक्षा.

M. Palani Kumar

M. Palani Kumar

M. Palani Kumar
मार्च महिना आला की जांभळाची झाडे पुन्हा बहरतील. फिकट पिवळ्या फुलांमधील मधाच्या शोधात रानमाशा पुन्हा डोंगरदऱ्यांत गोळा होतील. बी.आर. हिल्सच्या जंगलात मधाचा आणखी एक हंगाम येईल. अरुणचे तरुण मित्र उंच झाडांच्या दिशेने कूच करतील. आणि पुन्हा एकदा, 'जेनू कुय्यो हाडू' चे सूर जंगलात घुमतील:
हाक द्या त्याला, हाक द्या…
त्या रानमाणसाला हाक द्या…
टांगलेल्या पोळ्यांवर मध आहे…
टांगलेल्या पोळ्यांवर मध आहे…
टांगलेल्या पोळ्यांचा मध, दाटसर मध…
टांगलेल्या पोळ्यांचा मध, दाटसर मध…
हाक द्या त्याला, हाक द्या...
अरुणला तेव्हा ते गाणे माहीत नव्हते; आणि तो आता ते गाणारही नाही…

M. Palani Kumar

M. Palani Kumar

M. Palani Kumar

M. Palani Kumar
लेखिका अरुण आणि त्याचे कुटुंब, डॉ. तान्या शेषाद्री, डॉ. संगीता व्ही., सोलिगा समाजातील कार्यकर्ते करण केथेगौडा आणि महादेवनम्मा कुंबेगौडा (विवेकानंद गिरिजन कल्याण केंद्र, बी.आर. हिल्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, बंगळुरू), डॉ. प्रथमेश यांच्या बहुमूल्य सहकार्याबद्दल कृतज्ञ आहे. लेखनासाठी विविध टप्प्यांवर अनुवादात मदत केल्याबद्दल ती डॉ. शोभना किरण, शंकर केंचनूर आणि दीपा यांचेही आभार मानू इच्छिते.
अनुवाद : जयेश जोशी
Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]
Donate to PARI
All donors will be entitled to tax exemptions under Section-80G of the Income Tax Act. Please double check your email address before submitting.
PARI - People's Archive of Rural India
ruralindiaonline.org
https://ruralindiaonline.org/articles/the-broken-winged-bird-of-br-hills-mr

