लाखेच्या बांगड्या कुठे मिळतात असं जुन्या हैद्राबादमध्ये कुणाला पण विचारा. सगळे एकाच दुकानाचा पत्ता देणारः लाड बजारमधलं उस्मान का कारिगरी. या प्रसिद्ध दुकानावर साधा नावाचा बोर्ड पण नाहीये. गंज लागलेलं लोखंडी शटर उघडल्यावर आतमध्ये शेख अखील आणि शेख हजील हे दोघं बसून काम करताना दिसतात. दोघांच्या मध्ये एक बुटकंसं लोखंडी टेबल ठेवलेलं असतं.
हे दोघं भाऊ गेल्या दहा वर्षांपासून लाखेच्या बांगड्या बनवण्याचं काम करतायत. आणि दिवसाला प्रत्येकी ५०० बांगडी बनवू शकतात. तिथे अनेक प्रकारच्या बांगड्या विखुरलेल्या होत्या. काहींचं काम पूर्ण झालं होतं तर काहींचं बाकी होतं. “गुलाबी रंग सगळ्यात जास्त आवडता आहे,” अखील सांगतो. आणि बोलता बोलता गुलाबी रंगात रंगवलेला लाखेचा एक ठोकळा दाखवतो. काळा, सोनेरी आणि मोरपंखी रंगाच्या बांगड्या सुद्धा आवडीने घातल्या जातात. त्यावर जडवलेले जाणारे छोटे आरसे किंवा खडे पारकर्शक प्लास्टिकच्या डब्यांमध्ये भरून ठेवलेले दिसतात.
चारमिनारजवळच्या लाड बझारमधल्या या कारखान्यात आणि दुकानात लाकडाचा आणि पितळ्याचा वास भरून राहिलेला जवळच्या मशिदीतली अजान संपते, बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या खेळण्याचा आवाज विरतो आणि मग अखील आणि हजील कामाला सुरुवात करतात. दोघंही तिशी पार केलेले आहेत. आणि आजवर त्यांनी फक्त हेच काम केलेलं आहे. आजही अगदी शांतपणे, पूर्ण लक्ष देऊन त्यांना फक्त हेच काम करायला आवडतं.
उस्मान नावाच्या आपल्या एका नातेवाइकाचं नाव दुकानाला दिल्याचं ते मला सांगतात. “दुकान त्यांच्या मालकीचं आहे पण ते इथे काम करत नाहीत. मी आणि माझा भाऊ इथे काम करतो,” अखील सांगतो. त्यांना दुकानाचं भाडं द्यावं लागत नाही.














