नवीन कुमार टम्टांना आता सवय झालीये. लोक येतात अन् फोटो काढतात. व्हिडिओ घेतात. वयाच्या पन्नाशीत असलेला हा वाकबगार कारागीर, उत्तराखंडमधील अलमोडा गावात तन्मयतेनं आपलं काम करत राहतो. हतोडीचे घण घालत ताम्रकलेचे 'डाग' बनवत राहतो.
टम्टा ही जमात वंशपरंपरेनं तांब्यापासून वस्तू घडवते. टम्टा हे नाव त्यावरूनच, जसं महाराष्ट्रात तांबट आहेत. असं म्हणतात, हे लोक शेकडो वर्षांपूर्वी राजस्थानमधून हिमालयातील कुमाऊ प्रदेशात स्थलांतरित झाले. लोहाघाट मधील गोसनी गावाजवळ त्यांनी वस्ती वसवली. नागरवस्तीजवळचं वास्तव्यच या समुदायाला जगवू शकत होतं. काळ पुढे सरकला, तसं चंपावत या राजधानीचं महत्त्व घटलं, नि नवी राजधानी झाली अलमोडा. या स्थित्यंतरासोबत ही मंडळीही अलमोडात आली.
टम्टांची ही कला, पिढीजात घरगुती व्यवसायागत होती. "सगळे हसतखेळत काम करायचे. सोबत कुरघोडीही चालायची. एकाला दुसऱ्यापेक्षा चांगलं काम करायची खुमखुमी असायची. या हिरीशिरीतूनच काम खणखणीत व्हायचं." प्रदीप टम्टा सांगतात.
तांब्यावरील या कारागिरीत प्रत्येक टप्प्यावर महिलांची भुमिका कळीची. त्या आसपासच्या रानांत भटकून भट्टीसाठी सरपण आणत, भट्टी पेटल्यावर भाता चालवत, वेल्डिंगला लागणारी पावडर बनवत, तयार झालेला आयटम घासून पॉलिशिंग करत. काही महिला धीटाईनं हातोड्याचे घण बसण्याआधी पत्राही तापवत. तर काही डिझायनिंगही करत. याशिवाय घर नि लेकराबाळांचा सांभाळ हे कामही महिलांचीच जिम्मेवारी.































