उत्तर केरळमधील कोळीकोडमध्ये मॉन्सून रपारप कोसळतोय. स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट. वेळ रात्रीची. नि एक बुजुर्ग गेटसमोरच्या आडोशात शांत झोपलाय. तो हाडाचा कॉम्रेड, त्याला पर्वा नाही पावसाची. सकाळ झाली की, याच तंबूत तो आदिवासी कुटुंबाच्या संघर्षात दिसेल. जवळपास ७० दिवस उलटलेत. मल्लपूरमजवळच्या निलांबूर गावातील ६० कुटुंबांनी इथं तळ ठोकलाय. राज्य सरकारनं या कुटुंबांना जमीन द्यायचा वायदा केलेला. पण सरकार शब्दाला जागलं नाही. म्हणून मंडळींनी धरणं धरलंय. कुणास ठाऊक किती काळ चालेल हे आंदोलन, पण जोवर चालेल तोवर वयोवृद्ध ‘ग्रो’ वासूही इथे दिसतील.
वयाच्या शहाण्णव्या वर्षातले अयिनूर वासू या संघर्षाचा कणा आहेत. त्यांचं कणखर नेतृत्त्व पाहूनच लोक त्यांना प्रेमादरानं ‘ग्रो’ वासू म्हणू लागले. शरीर थकलंय, संभाषणातला स्वर मलूल वाटतोय, तरीही या लढ्यातील त्यांचा खंबीर वावर आंदोलनाची झळाळी वाढवतो. खरंतर हे वय अंथरुणावर पडायचं, पण वासू आपल्या कमजोर शरीराचं उरलंसुरलं वजनही लोकलढ्याच्या पारड्यात तोलू पाहताहेत. “सरकारनं या आदिवासींशी लबाडी केलीय.” ते म्हणतात, “आधी कबूली दिली, आता टेक्निकल प्रॉब्लेमचे घोडे नाचवतायत,” त्यांची पांढरीशुभ्र मिशी थरथरते, डोळ्यांत अंगार पेटतो नि ते म्हणतात, “जमीन ह्यांच्या हक्काचीये, का अधिकाऱ्यांच्या बापाचीये? सरकार उपकार थोडीच करतंय!”
२०२३-२४ मध्ये निलांबूरच्या याच आदिवासींनी शर्थ केलेली. तेव्हा यांनी (इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट) आयटीडीपी ऑफिससमोर सलग ३१४ दिवस आंदोलन केलं. नि आपली मागणी सरकारच्या गळी उतरवली.
जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं. पुढील सहा महिन्यांत प्रत्येक कुटुंबाला ५० गुंठे जमीन द्यायचं. पण १५ महिने उलटले. शासनानं वचन पाळलं नाहीच, उलट आता जमीन वाटपातील तांत्रिक अडथळे सांगितले जाताहेत. त्यामुळं ही कुटुंबं पुन्हा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलीत. नि एकेकाळी सशस्त्र क्रांतिकारी म्हणून ओळख असलेले, त्याखातर तुरुंगात राहिलेले ‘ग्रो’ वासू या सत्याग्रहात सामील झालेत. सत्याग्रहाचा पंडालच त्याचं घर झालंय.
वय ग्रो वासूंना भेडसावत नाही. अगदी अलीकडेच, २०२३ मध्ये त्यांनी दोन महिन्यांची जेलवारी केलीय. ही केस होती नोव्हेंबर २०१६ मधील. कोळीकोड मेडिकल कॉलेजच्या शवागारासमोरील आंदोलनाची. कोप्पम देवराजन व अजिथा हे दोन माओवादी निलांबूरच्या जंगलात पोलिस चकमकीत मारले गेले. ही कारवाई बनावट होती, तिचा निषेध व न्यायालयीन चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन झालं. यावेळी शवागाराच्या आवारात ग्रो वासूही होते. या गुन्ह्यासाठी त्यांना अटक झाली.
ग्रो वासूंनी जामिनासाठी अर्ज केला नाही. तुरुंगवास पत्करला. खटल्यानंतर ते निर्दोष मुक्त झाले. परिणामी शासनयंत्रणेची दडपशाही-हिंसा याबद्दलची ग्रो वासूंची टिकाटिप्पणी अधिकच तेजधार झालीय.








