हा लेख पार्थ एम. एन. यांच्या पुलित्झर सेंटरच्या पाठिंबा असलेल्या मालिकेतील आहे.
केरू दहिफळे हा काही मातब्बर गृहस्थ नाही. पण 'कर्ज झालं तरी बेहत्तर!' मानून ते गावजेवण देतात. या माणसाचं शेत एक एकर. या जमिनीवरच त्यांचं टिनचं छप्पर असलेलं घर. मे-२०२५च्या पहिल्या आठवड्यात, या छोट्याशा घराजवळ जवळपास ३००० माणसांची पंगत बसली. या भंड्याऱ्याचा मेन्यू शाकाहारी.
पण खर्च : तब्बल दिड लाख रूपये!
भंडाऱ्याचा हा खर्च दहिफळेंच्या ऐपतीवरचढ. तरी हा सत्तर वर्षीय गृहस्थ सावकाराकडे गेला, कर्ज घेतलं. व्याजदर महिन्याला तीन टक्के, अर्थात ३६ रूपये द.सा.द.शे.. आदल्यासाली रब्बीच्या हंगामानं निराश केलेलं. दहिफळेंनी ३५,००० रू. खर्चून कांदा पेरलेला. पण दुष्काळी परिस्थितीनं दगा दिला. पिकाचं नुकसान नि आता हे देवीच्या भंडाऱ्यासाठीचं कर्ज, दहिफळेंची मान मोडेल.
दोन वेळा हातातोंडाची गाठ पडणं मुश्कील, अशी गत असूनही, गावजेवणाचा बेत रहित करायचा विचारही दहिफळेंच्या मनाला शिवत नाही. ते म्हणतात, "करावं लागतंय, म्हवटामायची माया, देवीच्या किरपाआशिरवादासाठी भंडारा घालावाच लागतोय!"
अहिल्यानगर (नामांतरापूर्वी-अहमदनगर) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातलं मोहटे गाव. या गावातील एका वळणावरच दहिफळेंचं घर. या वळणावरूनच रस्ता मोहटादेवीच्या भव्य चार मजली देवस्थानाकडे जातो. २००९ ते २०१३ या काळात मंदिराचे मजले चढलेत, असं म्हणतात, देवळाचं हे बांधकाम करायला जवळपास वीस करोड खर्चलेत. श्री क्षेत्र मोहटादेवी गडाला शक्तीपीठ म्हणून मान्यता आहे. दरवर्षी साधारण २५ लाख भक्त इथं दर्शनाला येतात.













