तिथे झालेला अत्याचार पाहून हबीबुन्निसा हादरून गेल्या. पण आंदोलक विद्यार्थ्यांचं धैर्य त्यांना प्रेरित करून गेलं. “मी एक साधी सुधी आई आहे. माझी मुलं हेच माझं विश्व आहे,” त्या सांगतात. “एक गृहिणी म्हणून अगदी साधं जीवन मी जगत होते. पण सत्तेतल्या लोकांनी सगळा विस्कोट केला. त्यांच्या निर्णयांमुळे माझ्या मुलीचा जीव गेला. तुम्ही खरं तर आमचं रक्षण करायला पाहिजे. तुम्हीच आमची आयुष्यं उद्ध्वस्त करताय.”
३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा झाली आणि सनाचे सगळे पेपरची अगदी छान गेले होते. मात्र या परीक्षेचे पेपर फुटल्याचं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार असल्याचं सरकारने जाहीर केलं. सना कोलमडून गेली. नीटच्या तयारीने आधीच ती पार थकून गेली होती कारण ही परीक्षाच मुळात अतिशय अवघड असते. वीस लाखांहून अधिक विद्यार्थी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केवळ १,३०,००० जागा. वर्षानुवर्षं अभ्यास आणि तयारी केल्यानंतर आता कुठे सनाला जरा निवांत वाटलं होतं. पण पुन्हा एकदा तेच सगळं करणं नशिबी आलं.
पुन्हा एकदा परीक्षेचे पेपर लिहिण्याचा ताण इतका जास्त होता की त्या ऐवजी सनाने फक्त एक चिठ्ठी लिहिली. “आय ॲम सॉरी.” २१ जून रोजी नीटची पुनर्परीक्षा होती. त्याच्या आदल्या दिवशी सनाने आपल्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलं.
याच कारणासाठी वीसहून जास्त विद्यार्थ्यांनी मरण कवटाळलं.
“त्या सकाळी तिने माझा फोन उचलला नाही,” जाफर भाई सांगतात. “तिच्याशी जर बोललो असतो ना, ती आज आपल्यात असती,” आंदोलनस्थळी बोलणारे जाफर भाई पार कोलमडून गेले आहेत.
“मी इतक्या लांब इथे आले कारण माझी अवस्था काय झाली आहे हे मला सगळ्यांना सांगायचं होतं,” सनाची आई हबीबुन्निसा म्हणतात. आपली थोरली मुलगी आता या जगात नाही हे पचवणं अजूनही त्यांना जड जातंय. “कुणास ठाऊक, आम्ही पुढच्या पाच वर्षात मरून जाऊ किंवा पार म्हातारे होऊ. जोवर जिवंत आहोत तोवर हे दुःख उरात घर करून राहणार हे नक्की,” त्या म्हणतात. “रात्री मला झोप लागत नाही. अगदी मध्यरात्री सुद्धा हातापायाला कंप सुटतो.”
असं असतानाही आपल्या १५ आणि ११ वर्षांच्या दोघी मुलींना घरी सोडून हे दोघं दिल्लीला आले आहेत. “त्यांची सतत काळजी वाटतीये. पण मला सत्तेत बसलेल्यांना सांगायचं होतं की तुम्ही चुकला आहात. सत्तेच्या धुंदीने तुम्ही अंध झाला आहात का? माझ्यासारख्या आईसाठी ही मुलं आंदोलन करतायत. ती संवेदनशील आहेत. माझं दुःख ज्यांना कळालं त्याच या मुलांना पोलिसांनी निर्दयपणे मारलंय. खरं तर तुम्हाला आमचं दुःखच कळत नसेल, तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार तरी आहे का? कृपा करून या मुलांवर अत्याचार करू नका. बच्चों पे इतना जुल्म मत करीये.”