दानमती माझीला तुटपुंजी वृद्धा पेन्शन मिळते. त्यातली निम्मी रक्कम तिची मशेरी नि किरकोळ खर्चातच उडून जाते.
"हजार रुपय पेन्शन मिळती मला. पाश्शे रुपय मी भावाच्या सुनंला देते. ती मला जेवणखावण देती." दानमती सांगते, "बाकी मीठमिरची, तेलसाबण न् गुडाखूवर खर्च होत्यात." गुडाखू ही या भागातील तंबाखूची मशेरी.
दानमती आजी हसते, तेव्हा तिच्या बोळक्यात उरलेले दोन दात दिसतात. 'आजीबाई, एवढे पैशे तु फक्त हे दोन दात घासायला मशेरीवर खर्च करतेस', अशी थट्टा केल्यावर ती पुन्हा हसली नि म्हणाली, "गुडाखू लावल्याबिगर करमतच नाय. तुम्हाला गुटख्याची सवय असती ना तशीच मला गुडाखूची."
दानमती आजीचं घर मातीचं. छप्परही मातीच्याच कौलांचं. हे इतकं बुटकं घर, की आत शिरताना वाकूनच जावं लागतं. आत येताच, मोजक्या दोनचार वस्तू दिसतात – मातीची चुल, नाचणी कुटायचा दगडी खलबत्ता, एक टॉर्च न् थोडी बोचकीबाचकी ठेवलेली एक बांबूची टोपली. अंधारलं की, या टोपलीतली एक चादर अंथरूण आजी मातीच्या जमिनीवरच पाठ टेकते.
मी आजीशी गप्पा मारू लागलो, बोलता बोलता आजीनं दगडी जात्यावर दळण सुरू केलं. नि ती तिचं बालपण ती आठवू लागली. ओडीसातील कालाहांडीत दानमती आजीचं आयुष्य गेलंय. देशातील अत्यंत दरिद्र्यानं गांजलेला हा प्रदेश.












