२०२६ सालच्या मे महिन्यातला एक रविवार. ठिकाण- पश्चिम बंगालमधल्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातलं मातुआ समाजाचं आध्यात्म केंद्र. अर्थात, ठाकूरबारी. आज या ठाकूरबारीत ही अशी प्रचंड गर्दी जमलीय. पण प्रार्थनेसाठी म्हणून या गर्दीतले बहुतेक लोक इथे आलेले नाहीत. ते आलेत; नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी उपयोगी पडतील अशी कागदपत्रं मिळतील या आशेने! मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात लांबलचक रांगा लावून बऱ्याच वेळापासून ते थांबलेत; फक्त तेवढ्यासाठी!
हेच ते लोक! नावं वगळण्यात आलेले! मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत ९० लाखांहून अधिक नावं वगळण्यात आली होती. हे त्यापैकीच काही! २०२६ साली एप्रिल महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदान करता आलं नाही.
पंधरा मातुआबहुल विधानसभा मतदारसंघांमध्ये हिंदू नावं मोठ्या प्रमाणावर वगळण्यात आली.
ठाकूरबारीतल्या त्या गर्दीत एक आहेत, ललिता ढाली. कार्तिक या आपल्या नवऱ्याला सोबत घेऊन त्या इथे आल्यात; हिंदू कार्ड मिळवण्यासाठी! ललिता ४३ वर्षांच्या आहेत. कबिलासपूरला राहतात. स्कूटीवर साधारण ३० किलोमीटरचा प्रवास करून त्या ठाकूरबारीत पोहोचल्यात. अंतिम एसआयआर यादीत त्यांच्या नवऱ्याचं- कार्तिकचं नाव आहे. यांचं मात्र नाही!
१९५०च्या दशकात कधीतरी ललिताचे आजोबा आणि वडील भारतात आले होते. १९८४ मध्ये मात्र ते बांगलादेशात परत गेले. पुन्हा काही वर्षांनी ते भारतात परतले. "ओर बाबा एपारओपार कोर्तो. के जाने कोन पारे जोन्मे छे [तिचे वडील कधी इकडे कधी तिकडे असं करत राहिले. (सीमेच्या) कुठल्या बाजूला जन्मले, कुणास ठाऊक!]" ५३ वर्षांचे कार्तिक सांगत असतात.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उदयाला आलेला मातुआ हा एक ब्राह्मणविरोधी पंथ. “अविभाजित बंगालच्या पूर्व भागामधल्या विशेषत: नामाशूद्रांच्या एकत्र येण्यातून, एकजुटीतून हा पंथ निर्माण झाला. नामाशुद्र पश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जातीत सूचीबद्ध आहे. त्या काळात खालच्या मानल्या जाणाऱ्या या जातींचं संघटन हरिचंद ठाकूर यांनी बांधलं होतं.’’ अडचणीच्या, संकटकाळात अनेक मातुआ पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झाले आणि या मातुआंपाशी कागदपत्रं नाहीत. “फाळणीनंतर पूर्व पाकिस्तान / बांगलादेशात नामाशूद्रांना धार्मिक छळालाही तोंड द्यावं लागलं,’’ आयान गुहा सांगतात. आयान गुहा हे युनायटेड किंगडममधल्या ससेक्स विद्यापीठाचे फेलो आहेत. पश्चिम बंगालमधल्या जातींच्या सतत बदलणाऱ्या राजकीय स्वरूपाचा सखोल आणि व्यापक अभ्यास त्यांच्या गाठीशी आहे.












