दुर्गा आणि नारायणस्वामींचं ‘गंगाम्मा नीरनागा जडे हेणितवले’चं सादरीकरण संपता संपता संध्याकाळ होत आली. कोटिगानहळ्ळी रामय्या यांचं हे कन्नड नाटक. ते बोलतं जमीन आणि पाण्यावरच्या घटनात्मक अधिकारांबद्दल! या नाटकाचं सादरीकरण राज्यभर केलं जातं; ते अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी!
सादरीकरण संपता संपता संगीताचे सूर हवेत विरत जातात नि रस्त्यावर थाटलेल्या रंगमंचावर ते बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणून ठेवतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समाजसुधारक, समतेचे पुरस्कर्ते आणि दलितांच्या हक्कांचा विद्वत्तापूर्ण, लढाऊ आवाज!
लोक बसलेले असतात. मन लावून नाटक ऐकत असतात, बघत असतात. अन् जसा आंबेडकरांचा फोटो रंगमंचावर येतो तसं कर्नाटकातल्या या छोट्याशा गावातलं वातावरण क्षणार्धात पालटतं.
“जेव्हा आम्ही फोटो आणून ठेवतो, त्यानंतर मग आमच्या जातीचा अंदाज लावायला सुरुवात होते. आम्हाला पाणी नाकारलं जातं. ‘आमच्या व्हरांड्यावर बसू नका’ असं आम्हाला सांगितलं जातं. काही गावांमधलं सादरीकरणच आयोजक रद्द करून टाकतात,’’ नारायणस्वामी सांगत असतात.
दुर्गा ३१ वर्षांची. तिला तिच्या वयाविषयी, तिच्या वैवाहिक स्थितीविषयी आणि इतरही बरेच प्रश्न विचारले जातात: “तुझे आई-वडील आणि कुटुंबीय तुला अशा सादरीकरणात सहभागी व्हायची परवानगी देतात का?’’ वगैरे.



























