'कत्तिले कडा' मध्ये पहिला ग्राहक येण्यापूर्वीच, जंगलात दिवसाची सुरुवात झालेली असते.
पहाटेचा प्रकाश फुटताच, शशीकुमारी कानी आणि इतर बायका तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील विथुरा-पेप्पारा धरण रस्त्यावरून उतरून जंगलात चालू लागतात. हा पश्चिम घाटाच्या पायथ्याचा भाग आहे, जिथे रस्ता पेप्पारा जलाशयाच्या कडेने जातो आणि वस्त्या हळूहळू आदिवासी पाड्यांमध्ये विरून जातात. इथे स्वयंपाकाचं इंधन घरपोच मिळत नाही, तर ते हिंडून गोळा करावं लागतं.
डोक्यावर जळाऊ लाकडाच्या मोळ्या सावरत त्या परततात. त्यानंतरच स्वयंपाकघर उघडते. 'कत्तिले कडा'चा शब्दशः अर्थ 'जंगलातील दुकान' असा होतो.
रस्त्याच्या कडेला असलेल्या या छोट्या खानावळीत धूर उफाळतो आणि काळवंडलेल्या भांड्यांवर रेंगाळत राहतो. कोपऱ्यात एक न वापरलेला एलपीजी सिलिंडर पडून आहे. गॅसचे रिफिल वेळेवर मिळत नाही, किमती वाढल्या आहेत आणि पुरवठा अनिश्चित आहे.
"आम्ही आता गॅसवर अवलंबून राहू शकत नाही," ५९ वर्षांच्या शशीकुमारी सांगतात. "म्हणून आम्ही पुन्हा याकडे (चुलीकडे) वळलो आहोत."
इराणवर अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे द्रवरूप पेट्रोलियम गॅसच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असून संपूर्ण केरळमधील छोट्या खानावळींना याचा फटका बसत आहे. विलंब आणि वाढत्या खर्चामुळे अनेकजण पुन्हा जळाऊ लाकडांचा वापर करण्याकडे वळत आहेत.
'कत्तिले कडा' मध्ये या बदलामुळे संपूर्ण दिवसाचे वेळापत्रकच बदलून गेलं आहे.
चार वर्षांपूर्वी जेव्हा तिचे पती मणियन (५८) आजारी पडले आणि अंगमेहनतीचे काम करण्यास असमर्थ ठरले, तेव्हा शशीकुमारीने ही खानावळ सुरू केली. दक्षिण पश्चिम घाटातील जंगलाशी घनिष्ठ नाते असलेल्या 'कानी' या छोट्या आदिवासी समुदायाच्या त्या रहिवासी आहेत. त्यामुळे शशीकुमारीने तिला जे उत्तम ठाऊक होतं तेच निवडलं ते म्हणजे जमिनीशी नातं सांगणारे अन्न.
एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रम आणि 'कुटुंबश्री'च्या माध्यमातून मिळालेल्या कर्जाच्या सहाय्याने या महिलांनी उत्पन्नाचा स्रोत म्हणून रस्त्याच्या कडेला एक साधी खानावळ उभारली. कोविड-१९ लॉकडाउनच्या काळात या 'कुटुंबश्री हॉटेल'ने अनेकांना जगण्याचा आधार दिला होता.






