टेबलावर ठेवलेला मिठाईचा डबा मी उघडत असते नि हलकेच कानामनात एक जुनी ओळखीची हाळी घुमते - रामदाना लाई बा, बोवा के मिठाई बा. (गोड गोड लाडू, राजगिरा लाडू... छोट्या छकुल्यांसाठी लाडू...)
बिहारची राजधानी पाटणा. पाटण्यातला चांदपूर बेला मोहल्ला. कडकडीत उन्हाची इथली एक मरगळलेली दुपार. तेव्हा मी असेन साधारण बारा वर्षांची. मोठ्याने हाळी देत गल्ल्यागल्ल्यांमधून चाललेला एक फेरीवाला नेहमीसारखा या मोहल्ल्यात येतो. खांद्यावर असतो त्याच्या एक मोठ्ठासा काचेचा डबा नि त्यात शिगोशिग भरलेले असतात राजगिऱ्याचे लाडू.
त्याने विकण्यासाठी आणलेल्या मिठाईपेक्षाही जास्त माधुर्य होतं त्याच्या आवाजात! नि गोडवा होता आपुलकीचा! आम्ही फक्त गिऱ्हाईकं नव्हतो त्याच्यासाठी. आम्ही त्याचे ‘बौवा’ (छोटे छकुले) होतो आणि तशीच हाकही द्यायचा तो आम्हाला. ना कुणी विक्रेता, ना कुणी गिऱ्हाईक. ना बाजाराची गणितं, ना औपचारिक नातं. सगळाच आपलेपणाचा मामला.
आता मागे वळून पाहताना वाटतं, तेव्हा आपली मायबोली वर्गखोल्यांच्या भिंतींमध्ये अडकून पडली नव्हती. गल्लीबोळांमधून, रस्त्यारस्त्यावरून हाळ्या देत जाणाऱ्या फेरीवाल्यांच्या आवाजातूनही तिला कंठ फुटत होता, अगदी मुक्तपणे!







