पलामूच्या चैनपूर तालुक्यातल्या कंकारी गावात जे काही मोजके मेंढपाळ उरलेत त्यातला एक म्हणजे नंदू पाल. झारखंड राज्यात सहा लाखांहून अधिक मेंढ्या आहेत (२०१९). जवळपास ८८ लाखांहून अधिक जनावरांसह एकूण १.१ कोटी पशुधन असल्यामुळे देशातल्या प्रमुख शेळीपालक राज्यांमध्ये त्याची गणना होते. हे सर्व प्राणी गायरानांमधे (सामायिक कुरणं) चरतात.
“काही वेळा तर आम्हाला कुरणांच्या शोधात १२-१३ कोस [अंदाजे ४० किलोमीटर] पायपीट करावी लागते,” नंदूचे चुलत भाऊ ६२ वर्षीय रामरती सांगतात, “दोहरमध्ये पूर्वी गवत मुबलक असायचं; त्यात दांडे पुष्कळ असायचे आणि मगर गवतही! पण आता तेही नसतं.” मगर हा जाड, खरखरीत गवताचा एक प्रकार आहे. या प्रदेशातल्या दोहर (नैसर्गिक जलसाठे) भवती ते मुबलक प्रमाणात येतं. फक्त ओलसर मातीतच ते वाढतं आणि बहुतेकदा जनावरांसाठी चारा म्हणून वापरलं जातं. पाणवठे आटत चालल्याने हे गवतही आता कुठे दिसत नाही.
जनावरांना रवंथ करण्यासाठी उपयुक्त असं पुरेसं काही आता शेतजमिनीतूनही मिळत नाही. पूर्वी चना आणि चकवड (सेन्ना ऑब्टुसिफोलिया) सारखी पिकं घेतली जायची, त्यांचं बी शेतातच पडायचं. पण आता तेही मिळणं मुश्किल झालंय; कारण अगदीच कमी शेतकरी ही पिकं घेतात. त्याऐवजी आता बरेच जण मका, भात आणि गहू घेतात. आणि अशी पिकं घेतल्यावर चरण्यासाठी उपयुक्त असं काही शेतात शिल्लकच राहत नाही. “आताशा मेंढ्यांना पूर्वीसारखं पोषण नाही मिळत! आता दिसतं ते जरासं सावना गवत आणि डब गवत [सायनोडॉन डॅक्टिलॉन],” नंदू सांगतो.
दोन वर्षांच्या (२०२२ आणि २०२३) दुष्काळामुळे या भागातले पाण्याचे साठे कोरडे पडलेत किंवा अत्यंत प्रदूषित झालेत. “जिवंत राहण्यासाठी मेंढ्यांना स्वच्छ पाणी लागतं,” नंदू म्हणतो. गेल्या दशकात नंदूच्या डोळ्यादेखत इथले अनेक जलसाठे गायब झालेत.
“संकट अगदी गळ्याशी आलं होतं,” नंदू सांगतो. गेल्या वर्षीच्या दुष्काळात “दिवसभर चरूनही मेंढ्यांची भूक काही शमलीच नाही,” बोलता बोलता नंदूचा आवाज वाढतो. “हातोहात २० मेंढ्या गेल्या माझ्या मागल्या [२०२३] वर्षी!” किंचित थांबून नंदू सांगतो.
न्यूमोकोकल आजार होऊ नयेत म्हणून अलिकडेच नंदू आणि त्याच्या साथीदारांनी मेंढ्यांचं लसीकरण करून घेतलंय. त्यांच्या मते, ज्या जनावरांना स्वच्छ पाणी मिळत नाही त्यांना अशा आजारांचा धोका संभवतो.