पूर्व भारतातील समुद्रकिनाऱ्यावर पहाटेचे ३ वाजले आहेत. रामोलू लक्ष्मय्या ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी शोधण्यासाठी फ्लॅशलाइट वापरतायत. हातात एक लांब लाकडी काठी आणि बादली घेऊन आरके बीच आणि जलरीपेटातील आपल्या घरादरम्यानची वाळूमय वाट ते हळूहळू चालत येतात.
मादी ऑलिव्ह रिडले कासव अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात आणि विशाखापट्टणमचा उतारू वाळूमय किनारा हे घरटं तयार करण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे; १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपासून हे कासव इथे आढळून आले आहेत. तरीसुद्धा, उत्तरेकडे काही किलोमीटर अंतरावर, ओडिशाच्या किनारपट्टीवर देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात अंडी देण्याची ठिकाणं आहेत. मादी कासव एका वेळी १००-१५० अंडी देऊन त्यांना वाळूच्या खड्ड्यात खोलवर पुरतात.
“जेव्हा वाळू सैल वाटू लागते, तेव्हा इथे मादी कासवाने अंडी घातली असावी, असा अंदाज लावता येतो,” लक्ष्मय्या काठीने ओलसर वाळू काळजीपूर्वक तपासत सांगतात. लक्ष्मय्यासोबत करी जल्लीबाबू, पुट्टियापन येरान्ना आणि पुल्ला पोलाराव हे जालरी समाजातील (आंध्र प्रदेशातील इतर मागास प्रवर्ग) मच्छिमार आहेत. २०२३ मध्ये त्यांनी सागरी कासव संवर्धन प्रकल्पांतर्गत ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी जतन करण्याच्या उद्देशाने आंध्र प्रदेश वन विभागासोबत गार्ड म्हणून अर्धवेळ काम केलं.
इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या (आययुसीएन) लाल यादीत ऑलिव्ह रिडले कासवांना (लेपिडोकेलिस ऑलिव्हेसिया) 'असुरक्षित प्रजाती' म्हणून वर्गीकृत करण्यात आलंय. आणि भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (सुधारित १९९१) च्या अनुसूची-१ अंतर्गत ती संरक्षित प्रजाती आहे.
विशाखापट्टणममधील कंबलकोंडा वन्यजीव अभयारण्यातील प्रकल्प शास्त्रज्ञ यज्ञपती अडारी म्हणतात, “विशेषतः विकासाच्या नावाखाली घरट्यांना अनुकूल अशा किनारपट्टीच्या जागेवर होणारं बांधकाम आणि हवामान बदलामुळे नष्ट होत जाणारे सागरी अधिवास” यासारख्या अनेक कारणांमुळे कासवांना धोका आहे. समुद्री कासवांची त्यांच्या मांस आणि अंड्यांसाठी देखील शिकार केली जाते.















