“माझ्या आईची नी त्यांची एकदा भेट झालेली.”
शांतिनिकेतनमध्ये. ते कोण आहेत हे सगळ्यांना माहितीये.
बिपीन कर्माकर सरावलेल्या हातांनी रवींद्रनाथ टागोरांची छोटी मूर्ती घडवतायत; टागोर हे एक उत्तुंग सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व. “शांतिनिकेतनला येणारे पर्यटक आवर्जून रवींद्रनाथांची एखादी आठवण सोबत नेतातच. मग ती मूर्ती असो वा चित्र. आपण जसं पुरीला गेल्यावर जगन्नाथाची मूर्ती विकत घेतो तसंच,” ते अदबीनं सांगतात. याद्वारे ते एका हिंदू देवतेची तुलना २० व्या शतकातील या प्रसिद्ध साहित्यिकाशी करत होते. योगायोगाने, या कवीच्या आडनावाचा बंगाली भाषेतील उच्चार हाच त्या भाषेत ‘दिव्य’ या अर्थाचा शब्दही आहे. या भाषेत त्यांनी साहित्य आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले.
टागोरांनी एकेकाळी छोटंसं गाव असलेल्या या जागी आपली आश्रमशाळा आणि विद्यापीठ (विश्व-भारती) स्थापन करून आता शतकाहून अधिक काळ लोटला आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात वसलेलं शांतिनिकेतन आता एक गजबजलेलं शहर आणि पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनलंय. इथं आता कोलकात्याहून एक्सप्रेस ट्रेनने पोहोचायला तीन तासांपेक्षा कमी वेळ लागतो.
नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर शांतिनिकेतनच्या परिसराचा अविभाज्य भाग आहेत. दुकानांच्या पाट्यांपासून भिंतींवरील सजावटींपर्यंत, चित्रांपासून कपड्यांपर्यंत, चित्रपटगृहांपासून विविध प्रकारच्या स्मृतिचिन्हांपर्यंत, सर्वत्र त्यांचं अस्तित्व किंवा संदर्भ आढळतो. शांतिनिकेतनमध्ये टागोरांशी संबंधित काही ना काही गोष्ट नजरेस पडल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकणे कठीण आहे.

























