पुर्निया जिल्ह्यातल्या मक्याच्या शेतातून जाणारा हा मुख्य डांबरी रस्ता. या हंगामात रस्त्याच्या दोन्ही बाजू आपल्याला सोनेरी झळाळीने भरलेल्या दिसतात. मक्याचा कापणीचा हंगाम संपलेला आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतांच्या कडेला रस्त्याच्या काठावर पिवळेगर्द मक्याचे दाणे वाळण्यासाठी पसरून ठेवले आहेत. ते बघताना सोनेरी झळाळी असलेला गालिचाच अंथरला आहे असंच वाटतं. चांदवा-रूपासपूर मार्गावर आदिवासी टोल्याजवळ जाताना अनेक संथाल जातीचे बायका-पुरुष एक लाकडी नांगरासारखं साधन घेऊन मक्याचे दाणे उलटसुलट करताना दिसतात. कुठेतरी एखादा चौकीदार यावर लक्ष ठेवून असेल आणि लवकरच त्यांच्या दारात येऊन मालकांचा हिस्सा मागून घेईल. त्या मालकांच्या शेतावर हे आदिवासी पिढ्यान् पिढ्या बटाईदार म्हणून काम करतायत. राज्यात भूमीअधिकार सुधारणा कायदा झाल्यानंतर सुद्धा आजही त्यांना आपल्या पिकाचा काही भाग मालकांना द्यावा लागतो.
मुख्य रस्त्यापासून थोडं आत गेल्यावर बाजूला गावाजवळच त्यांचे पूर्वज पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या नरसंहाराच्या स्मृतीसाठी उभारलेल्या स्मारकात जमून आजही जागरण करतात. कुंपण असलेल्या मैदानात उंच व्यासपीठावर उभारलेल्या पांढऱ्या स्तंभावर एक संगमरवरी पट्टी आहे, ज्यावर २२ नोव्हेंबर १९७१ रोजी जमीनदारांनी निर्दयपणे ठार केलेल्या चौदा जणांची नावे कोरलेली आहेत.
“संपूर्ण गाव म्हणजे जणू स्मशानभूमीच झाली होती. प्रत्येक घरातून फक्त आक्रोश आणि धूरच दिसत होता. लोकं हंबरडा फोडून रडत होते. त्यांनी म्हणजे जमीनदारांच्या खासगी सैन्याने आम्हां संथाल आदिवासींची ४५ घरे जाळून राख केली होती.” किशोरवयीन असताना शिवनारायणने पाहिलेल्या त्या हत्याकांडाच्या आठवणी काळाने आजही पुसल्या गेलेल्या नाहीत. आणि काळानुरुप त्यांच्यासाठी सकारात्मक असं फारसं काही बदलेलंही नाही.
“तेव्हाही हा संघर्ष भूमीसाठीच होता,” ७० वर्षीय शिवनारायण मुर्मू सांगतात. त्या नरसंहारात त्यांनी त्यांचे दोन नातेवाईक गमावले. “सूर्यही मावळलेला नव्हता.” २०२५ च्या जुलै महिन्यातल्या एका संध्याकाळी बोलताना शिवनारायण पुन्हा त्या काळात हरवून गेल्याचं आपल्याला स्पष्ट जाणवतं. ते सांगतात, “बंदुका, काठ्या, कुऱ्हाडी घेऊन ते लोक आले. त्यांनी आमच्या वस्त्यांना सर्व बाजूंनी वेढा घातला आणि आमची घरं चक्क पेटवून दिली होती. इतकंच नाही तर जो कोणी समोर दिसेल त्याला गोळ्या घातल्या किंवा जाळून मारून टाकलं.”
पण शिवनारायणसाठी ही वेदना त्याहूनही खोल आणि जुनी आहे. नरसंहाराच्या सुमारे सात वर्षांपूर्वी, ते अवघे दहा वर्षांचे असताना, त्यांचे वडील लखनलाल हेम्ब्रम यांची हत्या झाली होती. आणि याला कारण पुन्हा एकदा तीच जमीन होती. “ते शिकलेले होते आणि संथाल आदिवासींच्या मालकी हक्कांसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच न्यायालयात जात असत. एकदा काही जमीनदार पक्षाचे लोक त्यांना भेटायला आले होते. थोडीफार चर्चा झाल्यानंतर माझे वडील त्यांना सोडायला म्हणून गेले आणि गेले ते गेलेच. पुन्हा घरी परतलेच नाहीत. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा गळा चिरलेला मृतदेह घरापासून चार किलोमीटर अंतरावर जंगलात सापडला.” पण या घटनेनंतर आजपर्यंत कोणालाही शिक्षा झाली नाही.
पुर्नियाच्या नरसंहारानंतर दहा वर्षांनी, जेव्हा खालच्या न्यायालयाने या प्रकरणातील २५ ते ३० जमीनदार आरोपींना वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, तेव्हा शिवनारायणला वाटलं होतं की काळ बदलत आहे.
पण त्यांना गोष्टीची अर्धीच बाजू ठाऊक होती.















