रुखाबाई पाडवी बोलत असतात आणि बोलता बोलता त्यांना त्या कापडावरून आपला हात फिरवल्यावाचून राहावत नाही. बोलण्याच्या ओघात आपल्याला जाणवतं की असा हात फिरवता फिरवता त्या मनाने अलगद दुसऱ्या कुठल्या तरी काळात आणि आयुष्यात जाऊन पोहोचतात.
“ही माझी लग्नाची साडी!’’ अक्राणी तालुक्यातल्या डोंगराळ आणि आदिवासी भागात बोलल्या जाणाऱ्या भिल्ल या आदिवासी भाषेत त्या बोलू लागतात. खाटेवर बसलेल्या ९० वर्षांच्या वृद्ध रुखाबाई आपल्या मांडीवरच्या त्या सोनेरी काठाच्या गुलबट सुती साडीवरून हळुवार हात फिरवतात.
“ही साडी माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या कष्टाच्या कमाईतल्या बचतीतून विकत घेतली होती. त्यांची आठवण आहे ही!’’ अगदी एखाद्या लहानग्या मुलासारखं निरागस हसत त्या सांगतात.
रुखाबाईंचा जन्म नंदुरबार जिल्ह्यामधल्या अक्राणी तालुक्यातल्या मोजारा या गावचा!
माझ्या लग्नासाठी आई-वडिलांनी ६०० रुपये खर्च केले. त्या काळात ते खूप होते. त्यांनी या लग्नासाठी म्हणून कपडे घेतले ते पाच रुपयांचे! ही साडीसुद्धा त्यातच होती,’’ त्या सांगतात. दागिने मात्र त्यांच्यासाठी त्यांच्या लाडक्या आईने घरच्या घरीच बनवले होते.
“ना कुणी सोनार होता ना कारागीर! चांदीच्या नाण्यांचा एक कंठहार माझ्या आईने स्वत: बनवला. अगदी खरेखुरे पैसे. चांदीच्या नाण्यांना तिने भोकं पाडली आणि ती नाणी गोधडीच्या जाड धाग्यात ओवली,’’ आईच्या त्या जिवापाड मेहनतीची आठवण काढत रुखाबाई सांगतात, “चांदीची नाणी बरं... आजच्यासारखे कागदी पैसे नाही!’’








