पी. सेनरायापेरुमल यांना शाळा सोडून जातीने लादलेल्या राजा-राणी अट्टम या नाटकांमध्ये काम करावंच लागलं. त्यांचं आणि त्यांच्या भावंडांचं अख्खं बालपण खेळातली स्त्री पात्रं साकारण्यात गेलं. लोकांचं अचकट विचकट बोलणं, लैंगिक छळ आणि परंपरेचं ओझं वाहत.
वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी एक डाव टाकायचा ठरवला. सुटून गेलेलं शिक्षण पुन्हा सुरू करण्याचा डाव. तेही पोटासाठी रात्रीचे खेळ सादर करत. व्यवस्थेने त्यांना नाकारलेलं शिक्षण त्यांनी मिळवलंच. आपण स्वतः सादर करत असलेल्या कला प्रकाराचा अभ्यास करत त्यांनी लोक कला विषयात पीएचडी प्राप्त केली. या देशातल्या उच्च शिक्षणावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. मात्र हा विश्वास फारच त्रोटक ठरला.


